सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे प्रस्तावित विमानतळ व त्यासाठी होणारे भूसंपादन हे उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी असून, पालकमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ब्रम्हदेव आला तरी विमानतळपुरंदरलाच होणार असे सांगत आहे. मात्र, तुम्ही ब्रम्हदेवाचे नाव घेऊन तुम्हाला घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होऊ देऊ नका. उद्योगपती अदानीच्या होऊ घातलेल्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल तर बारामतीला विमानतळ का करीत नाही? अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
वनपुरी (ता. पुरंदर) येथे विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्यावतीने विरोध करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रय झुरंगे, पी. एस. मेमाणे, नीरा बाजार समितीचे संचालक महादेव टिळेकर, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, खानवडीच्या स्वप्नाली होले, पारगावच्या ज्योती मेमाणे, तात्यासाहेब मगर, सतीश कुंभारकर, रामदास कुंभारकर, चेतन मेमाणे, संतोष कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, ॲड. संजय कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर तसेच वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, कुंभारवळण या गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, आपले संसार, तरुण पिढी वाचवण्यासाठी आपल्याला जमीन जपली पाहिजे. सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करायची त्यांची नीती असल्याने सर्वांनी एकजूट कायम ठेवा. आपली घरे, जमीन वाचविण्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे.
बैठकीला उपस्थित राहू नका
शासकीय अधिकारी आपल्या गावात येतील, आपल्याशी गोड बोलून सह्या घेतील, त्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे अधिकारी कितीही आपल्या गावात आले आणि कितीही विनंत्या केल्या तरी कोणीही उपस्थित राहू नका. विमानतळ करण्याची काही लोकांची मानसिकता असली तरी आपण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. विमानतळाचे फायदे सांगितले जात आहेत, तोटे सांगितले जात नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींचा सर्वांनी विचार केला पाहिजे. एकदा हाक दिल्यावर सर्वांनी एकाच वेळी उभे राहिल्यास प्रकल्प माघारी जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास निवृत्त शिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी व्यक्त केला.