नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी
By निलेश राऊत | Updated: February 29, 2024 19:37 IST2024-02-29T19:37:37+5:302024-02-29T19:37:59+5:30
आयुक्तांशी झालेल्या भेटीत आपच्या पदाधिकाऱ्यांनी नदी सुधार व स्वच्छतेसाठीचे निवेदन देऊन आपच्यावतीने महापालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी
पुणे: पुणे शहराची जीवनदायीनी असलेल्या मुळा मुठा नदीची प्रदूषणामुळे मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पावर खरोखर किती खर्च झाला, मैलापाणी शुध्दीकरणासाठी आणलेल्या जायका प्रकल्पबाबतही नागरिकांना माहिती मिळावी. यासाठी महापालिकेने या सर्व खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली.
आम आदमी पक्षाच्यावतीने मुळा-मुठा नदीची पाहणी करून, नदीचे पाणी बाटल्यांमध्ये भरून नुकतेच ते महापालिका आयुक्त, पुण्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गुरूवारी आयुक्तांशी झालेल्या भेटीत आपच्या पदाधिकाऱ्यांनी नदी सुधार व स्वच्छतेसाठीचे निवेदन देऊन आपच्यावतीने महापालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आयुक्तांच्या आपने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सकारात्मकतेने घेऊन, येत्या सोमवारी सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे कृणाल घारे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, सचिव अमोल मोरे, प्रभाकर कोंढाळकर आदी उपस्थित होते.