पुणे : कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत पवार म्हणाले, राज्यातील लस मोफत संदर्भात एक मे रोजी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. सिरमचे अदर पुनवाला यांच्याशी लसींच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत. राज्य सरकारनेही लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहावे लागेल. उज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे आम्हीही लसी संदर्भात नागरिकांना आवाहन करणार असून ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी, गरिबांना आम्ही लस देऊ, असे अजित पवार म्हणाले.
राज्यासाठी रेमडिसिविरचा कोटा कमी करण्यात आला आहे त्यासंदर्भात आम्ही केंद्रांशी बोललो आहे. जामनगरमधील ऑक्सिजनचा 250 मेट्रिक टनचा कोटा होता तो कमी करण्यात आला आहे. तो कमी करू नका यासंदर्भात देखील केंद्रांशी चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना देखील ऑक्सिजन निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या आहेत.