डॉ. नरेंद्र दाभोलकर खटला: इतर साक्षीदारांना दाखविली नाहीत संशयित आराेपींची छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:43 AM2023-08-25T11:43:44+5:302023-08-25T11:44:38+5:30

पुढील सुनावणी दि. ५ सप्टेंबरला होणार आहे....

Dr. Narendra Dabholkar case: Photographs of suspected accused not shown to other witnesses | डॉ. नरेंद्र दाभोलकर खटला: इतर साक्षीदारांना दाखविली नाहीत संशयित आराेपींची छायाचित्रे

डॉ. नरेंद्र दाभोलकर खटला: इतर साक्षीदारांना दाखविली नाहीत संशयित आराेपींची छायाचित्रे

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासामध्ये सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोट केले होते. अजून एक सातवा साक्षीदार होता; पण मी तो का तपासला हे मला सांगता येत नाही. माझ्याकडे त्याचे रेकॉर्ड नाही. त्यातील दोन साक्षीदारांना सोडून बाकी कुठल्याच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखविली नाहीत. ती का दाखविली नाहीत, हे मला सांगता येणार नाही, अशी कबुली सीबीआयचे तत्कालीन अधिकारी एस.आर. सिंग यांनी बचाव पक्षाच्या उलटतपासणी दरम्यान दिली. त्यावर कुणाचा दबाव होता का? असे विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. पुढील सुनावणी दि. ५ सप्टेंबरला होणार आहे.

या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती केली आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणातील सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस.आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी उलटतपासणी घेतली. सलग चार दिवस सिंग यांची उलटतपासणी सुरू आहे.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघेही येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, हेही मला अवगत होते. पण मी त्यांची कारागृहातील ओळख परेड केली नाही, असेही सिंग यांनी सांगितले. खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चिट दिली नाही, असेही ते म्हणाले. बंदुकीतील गोळ्या या खडकी फॅक्टरीमधल्या होत्या हे माहिती असूनही फॅक्टरीमधून गोळ्या कशा बाहेर गेल्या याबाबत तपास केला का? असे इचलकरंजीकर यांनी सिंग यांना विचारले, पण तसा तपास केला नाही, असे सिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस लावले होते हे खरे आहे का? असे बचाव पक्षाने विचारले असता त्यांनी गोळ्या झाडल्या असे माझे म्हणणे नव्हते. ते केवळ संशयित होते, अशी कबुली सिंग यांनी न्यायालयात दिली.

Web Title: Dr. Narendra Dabholkar case: Photographs of suspected accused not shown to other witnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.