सारस्वतांच्या महाद्वारी सरस्वती प्रगटली! : डॉ. अरुणा ढेरे यांचा ह्रद्य सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:19 PM2018-11-01T19:19:53+5:302018-11-01T19:33:14+5:30

रांगोळयांच्या पायघड्या...पणत्यांची आरास... पुष्पवृष्टी...पुष्पगुच्छांमधून झालेला शुभेच्छांचा वर्षाव...प्रत्येकाच्या डोळयात दाटलेले कौतुक...

Dr. Aruna Dhere's honorable honor by maharashtra sahitya parishad | सारस्वतांच्या महाद्वारी सरस्वती प्रगटली! : डॉ. अरुणा ढेरे यांचा ह्रद्य सन्मान

सारस्वतांच्या महाद्वारी सरस्वती प्रगटली! : डॉ. अरुणा ढेरे यांचा ह्रद्य सन्मान

Next
ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा मसापतर्फे सन्मानअरुणा ढेरे यांनी नदीकाठचे पुणे आणि लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे : रांगोळयांच्या पायघड्या...पणत्यांची आरास... पुष्पवृष्टी...पुष्पगुच्छांमधून झालेला शुभेच्छांचा वर्षाव...प्रत्येकाच्या डोळयात दाटलेले कौतुक...अशा प्रसन्न आणि रसिकांच्या उपस्थितीने भारावलेल्या वातावरणात संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ह्रद्य सन्मान करण्यात आला.  सारस्वतांच्या महाद्वारी सरस्वती प्रगटली, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात दाटली होती. साहित्यप्रेमींनी सभागृह खच्चून भरले होते. सन्मानाने अरुणाताईही कमालीच्या भारावून गेल्या. त्यांच्या शब्दसुमनांनी प्रतिभा, प्रज्ञा आणि परंपरेचा अनोखा मिलाफ अनुभवता आला. 
यावेळी ज्येष्ठ कवयित्री नीलिमा गुंडी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते. विविध संस्थांतर्फे पुष्पगुच्छ देऊन अरुणा ढेरे यांना गौरवण्यात आले. रामचंद्र देखणे, डॉ.न.म.जोशी, जयराम देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या साहित्य-संस्कृतीमध्ये वटवृक्षासारखी माणसं होऊन गेली. त्यांनी वाड.मय गोष्टींचा मोह न बाळगता साहित्याची सेवा केली आणि वाड.मय संस्कृतीला आकार दिला. ही माणसं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर राहिली तरी त्यांचं काही बिघडलं नाही. मात्र, ते या पदापासून दूर राहिले, हा आपला करंटेपणा आहे.पुरोगामी, परंपराशील महाराष्ट्र ही ओळख जपायची असेलसंमेलन दुष्काळी भागात होत असल्याने ते साधेपणाने व्हावे आणि संस्कृतीची आंतरिक श्रीमंती असणा-या रसिकांच्या उपस्थितीने श्रीमंत व्हावे, अशी अपेक्षा ढेरे यांनी व्यक्त केली.
ढेरे म्हणाल्या, पुरोगामी आणि त्याचवेळी परंपराशील महाराष्ट्र अशी ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. आपल्यासमोर खूप मोठा पसारा आहे. त्यातील काय निवडायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. संमेलनाच्या बदलबाबत आपण सन्मुख झाले पाहिजे. संमेलन सकरात्मक दृष्टीच्या माणसांनी श्रीमंत व्हावे. चांगल्या माणसांचा आवाज उंच उठेल असे आश्वासक वातावरण आता निर्माण झाले आहे. आपण सर्वांनी एकमेकांना आवाज बनले पाहिजे.
नीलिमा गुंडी म्हणाल्या, अरुणाच्या निवडीने अवघे मराठीविश्व आनंदून गेले आहे. सर्व लेखनप्रकारांमध्ये मुशाफिरी करताना त्यांनी आपली संवेदनशीलता कमालीची जपली आहे. प्रबोधन युगाचे संस्कार जपत त्यांनी आधुनिक जीवनदृष्टी दिली आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता उत्कट सर्जनशीलतेतून आलेले कलात्मक साहस तिच्यामध्ये आहे. ती वाचणारी लेखिका आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. उध्दव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
..................
अरुणा ढेरे यांनी नदीकाठचे पुणे आणि लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. दुर्गा भागवत यांच्या नदीप्रेमाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, दुर्गाबाईंची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या सत्कारात त्या केवळ नदीबद्दलच बोलल्या होत्या. पूर्वी पुणे हे नदीकाठचे गाव होते. आता या नदीची गटारगंगा झाली आहे. पाण्याचे आपण विष करुन टाकले आहे. आता तरी सामाजिक आणि सार्वजनिक भान जागृत व्हायला हवे.
लहानपणी आम्ही शनिवार पेठेत राहायचो. त्यावेळी मी शनिवारवाड्यात जाऊन बकुळीची फुले वेचायचे आणि फ्रॉकला फुलांचा गंध खूप वेळ दरवळत रहायचा. अजूनही त्या आठवणींना सुगंध ताजा आहे. या निवडीच्या रुपाने होणा-या कौतुकाचा सुगंधही महत्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Dr. Aruna Dhere's honorable honor by maharashtra sahitya parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.