पुणे : ‘‘सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते, ही सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत. राज्यामध्ये गुंतवणूकदार येत आहेत. त्यांच्याकडे जर खंडणी मागितली जात असेल तर कोणीही महाराष्ट्रात येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे, त्यांचे हे अपयश आहे. उच्चपदस्थांचे त्वरीत राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुण्यामध्ये रविवारी (दि.५) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना धमक्या येत आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. एखाद्याची निघृण हत्या करणं हा मानवतेचा मुद्दा आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सरकारच या घटनांना जबाबदार आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री शांतपणे याकडे पाहत आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.’’
‘‘सर्वांना माहिती आहे की, दोषी कोण आहेत. त्या लोकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. जर गुंतवणूकदार आले नाहीत तर रोजगार निर्माण होणार नाही. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उत्पन्न घटत चालले आहे. देशात महाराष्ट्रात अकराव्या स्थानावर आले आहे. हे सर्व भाजपचे अपयश आहे. परळी पॅटर्न जगजाहीर आहे. बीडमध्ये काय चालले ते सर्वांना माहिती आहे. राजकीय हेतूसाठी संबंधितांना वाचवले गेले तर जनता शांत बसणार नाही,’’असे चव्हाण म्हणाले.