अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका; क्षणात बँकखाते होऊ शकते साफ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST2021-08-22T04:14:31+5:302021-08-22T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केवायसी अपडेट करायची आहे. लॉटरी लागली आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून सायबर चोरटे इतके ...

अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका; क्षणात बँकखाते होऊ शकते साफ !
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केवायसी अपडेट करायची आहे. लॉटरी लागली आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून सायबर चोरटे इतके दिवस आपली ऑनलाईन फसवणूक करत होते. आता त्यांचाच कित्ता गिरवत काही जण अर्जंट कॉल करण्यासाठी भावनिक आवाहन करतात. आपल्याकडून एका कॉल करण्यासाठी मोबाईल घेतात. अन् त्याद्वारे आपल्या डोळ्यादेखत मेसेज करून आपला ओटीपी घेऊन फसवणूक करतात. अशी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे कोणाही अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल हाताळायला देऊ नका.
सायबर चोरटे इतके दिवस ऑनलाईनद्वारे लोकांची फसवणूक करत होते. दुसऱ्या एखाद्या राज्यात, देशात बसून ही फसवणूक केली जात असे. मात्र, आता अनेक शहरांमध्ये प्रत्यक्ष तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते.
एखादा तरुण, तरुणी रस्त्यात तुम्हाला गाठतो. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे. महत्त्वाचे काम आहे. अर्जंट काॅल करायचा आहे. असे सांगून तुम्हाला भावनिक आवाहन करतो. तुमच्याकडून मोबाईल घेतो. कॉल करण्याचा बहाणा करून नजर चुकवून मेसेज करतो. त्यानंतर येणारा ओटीपी लक्षात ठेवून बोलत असल्याचे दाखवून तुमचा मोबाईल परत करतो आणि धन्यवाद देऊन निघून जातो. त्यानंतर काही क्षणात तुमच्या बँक खाते रिकामे होेते.
ही काळजी घ्यावी
आपल्या बँक खात्यासंदर्भातील माहिती कोणाला देऊ नये. बँकेचे अधिकारी कधीही माहिती विचारत नाही. त्यामुळे कोणीही फोन करून त्याची माहिती विचारल्यास देऊ नये.
कोणी तुमच्याकडे कॉल करण्यासाठी मोबाईल मागितल्यास देऊ नये. जर अगदीच त्याची गरज असल्याचे वाटत असेल तर त्याच्याकडून तुम्ही नंबर मागून घ्या. स्वत: नंबर डायल करा व मोबाईल तुमच्याकडेच ठेवून स्पीकर ऑन करून त्याला बोलायला सांगा. त्यामुळे जर तो फसवणूक करणारा असेल तर त्याचा उद्देश असफल होईल. जर त्याला खरंच गरज असेल तर तुम्ही मदत केल्याने त्याचे कामही पूर्ण होईल.
ओटीपी मागून क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.