निरगुडसर : संतांनी दिलेला समतेचा विचार लक्षात घेऊन कुठल्याही जाती-पातीचे, धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, हा प्रमुख संतांचा जो विचार आहे तो आचरणात आणला पाहिजे, असे मत माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.निरगुडसर ता. (आंबेगाव) येथे आयोजित निरगुडेश्वर मंदिर व दत्त मंदिर कलशारोहण व प्राणप्रतिष्ठान सोहळा कार्यक्रम प्रसंगी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता कीर्तन सोहळा ह.भ.प कबीर महाराज यांच्या हरी किर्तनाने पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले निरगुडसर गावामध्ये असतील किंवा इतरही गावांमध्ये लोकसहभागामधूनची कामे होतात, ती कामे झाली पाहिजेत. सर्व गावातील लोकांनी, तरुणांनी गावातील धार्मिक किंवा सांस्कृतिक-संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी श्री निरगुडेश्वर आणि श्रीदत्त महाराज मूर्ती यांची ग्रामप्रदक्षिणा व मंदिर कलश मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीत कलशधारी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. निरगुडेश्वर मंदिर मुख्य चौक ते बस स्थानक मार्गे पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक सहभागी झाले होते. तसेच, महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली होती. अनेकांनी फुगड्या खेळत आनंद लुटला, महिलांनी घरासमोर रांगोळी काढली होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
जाती-पातीचे, धर्माचे राजकारण करू नका: दिलीप वळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:53 IST