प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : आरोग्यास पोषक वातावरण, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता, इतर शहरांच्या तुलनेत कमी दर, अद्ययावत तंत्रज्ञान आणि साधनसामग्री यामुळे शहराने आता मेडिकल हब म्हणून नवी ओळख मिळवली आहे. पुण्यातील बहुतांश रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणीकृत असल्यामुळे गरीब रुग्णांना माफक दरात उपचार देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे, आयएमएतर्फे प्रशिक्षित शहरातील सुमारे ५० रुग्णालयांना एनएबीएच मानांकनही नुकतेच मिळाले आहे.
वैद्यकीय संशोधनात भरारी गरजेचीआधुनिक वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत पुण्याने भरारी घेतली आहे. वैद्यकीय संशोधनात मात्र शहरामध्ये अद्याप सकारात्मक चित्र पहायला मिळत नाही. योग्य धोरणे, अनुदान आदींच्या बाबतीत उदासिनता असल्यने वैद्यकीय संशोधनाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. हे चित्र बदलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
----------वैद्यकीय क्षेत्राला आता मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरुप आले आहे. विशेषत:, मोठ्या शहरांमध्ये ही व्यावसायिकता जास्त अधोरेखित होते. मात्र, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद अशा शहरांच्या तुलनेत व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन डॉक्टर-रुग्ण संबंध आजही टिकून आहेत. दोन्हीकडून चांगल्या पध्दतीने संवाद होतो. पुण्यातील वैद्यकीय उपचारांचे दर इतर शहरांच्या तुलनेत ३०-४० टक्कयांनी कमी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार परवडण्याजोगे असतात. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पुण्यामध्ये सव्वा ते दीड लाख रुपये खर्च येत असेल, तर इतर शहरांमध्ये तो खर्च दोन-अडीच लाखांपर्यंत जातो. ओमान, इटली, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांतून रुग्ण उपचारांसाठी पुण्यात येतात.- डॉ.के.एच.संचेती, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ-----------जागतिकीकरणामुळे पुणे सर्व राज्यांशी, शहरांशी जोडले गेले आहे. पुण्यातील नागरिकांचे वैद्यकीय क्षेत्राबाबतचे अनुभव चांगले असल्यामुळे देशा-परदेशातील नागरिकांपर्यंत ही ख्याती पोहोचली आहे. पुण्यातील डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करताना दिसतात. अद्ययावत तंत्रज्ञान विकत घेता येते, मात्र, अद्ययावत ज्ञान सर्वत्र असतेच, असे नाही. याबाबतीत पुण्याने कायमच बाजी मारली आहे.- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय तज्ज्ञ...........पुण्यामध्ये प्राचीन वैद्यकीय उपचार आणि आधुनिक उपचारपध्दती यांचा संगम पहायला मिळतो. निष्णात डॉक्टर आणि अद्ययावत रुग्णालये ही पुण्याची जमेची बाजू आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे २०० रुग्णालयांना एनएबीएच नामांकनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ५० रुग्णालयांना मानांकन मिळाले असून, १२५ रुग्णालये तपासणी प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. - डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, आयएमए......