पुणे :पुणेरेल्वे स्थानकावर फलाटांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक वेळा रेल्वेगाड्यांना वेळेवर फलाट उपलब्ध होत नाही. मुंबईहून येणाऱ्या गाड्या खडकी, शिवाजीनगर आणि सोलापूरवरून येणाऱ्या गाड्यांना घोरपडी यार्डच्या पुढे थांबविले जाते. यामुळे वेळेवर गाड्या पोहोचून सुद्धा पुणे स्टेशनवर गाड्यांना फलाट उपलब्ध होत नसल्याने उशीर होतो. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकावर फलाटांची संख्या केवळ सहा आहे. त्या तुलनेत गाड्यांची संख्या दीडशेवर आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर कायम रहदारी असते. फलाटांची संख्या कमी असल्याने अनेक वेळा रेल्वेगाड्यांना विनाकारण बाहेर थांबविले जाते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या शिवाय उपलब्ध फलाटांची लांबी कमी असल्याने पुण्यातून धावणाऱ्या जवळपास चाळीस गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविता येत नाही. दुसरीकडे यार्ड विस्तारीकरणाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. गेल्या वर्षी फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू होण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. तसेच, कामाचा कालावधी देखील कमी करण्यात आला होता. परंतु, अद्यापि या कामाला वारंवार ‘खो’ मिळत आहे. त्याचा थेट फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे.
...म्हणून २४ डब्यांची गाडी सोडता येत नाही
पुणे रेल्वे स्टेशन येथे सहा फलाट आहेत. पण, त्यांची लांबी कमी असल्यामुळे २४ डब्यांच्या गाड्या येथून सोडता येत नाहीत. पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्ड रिमॉडलिंगच्या (फलाट विस्तारीकरण) कामाला २०१६-१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. पण, ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुणे रेल्वे स्टेशनचे यार्ड रिमॉडलिंगचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळखात पडून आहे. या कामाला सुरुवात होणार असे वाटत असतानाच काम पुढे ढकलले जात होते. आता पुणे रेल्वे विभागाकडून पुणे रेल्वे स्टेशनच्या रिमॉडलिंगच्या कामाबरोबरच प्लॅटफॉर्म वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आराखडा नुकताच रेल्वेने पूर्ण केला आहे. त्यानुसार त्याला अंतिम मजुरी कधी मिळणार यासाठी वाट पाहावी लागणार आहे.