वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:04 IST2017-12-27T16:33:49+5:302017-12-27T17:04:29+5:30
समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा
पुणे : समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. त्यांच्या जगण्याला आधार देण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या योजना लाभदायी आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम कौतुकास्पद असून यापुढे पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत कसबा मतदार संघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, तहसीलदार अर्चना यादव, नायब तहसीलदार विलास भानोसे, नगरसेवक महेश लडकत, दीपक पोटे, राजेंद्र खेडेकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रांचे वाटप बापट यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिराच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तहसीलदार अर्चना यादव यांनी आतापर्यंत तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कचरा वेचक आदी कष्टकऱ्यांचे मेळावे घेऊन योजनेची माहिती दिली आहे. मोहिमेदरम्यान, विधवा, अपंग, परित्यक्त्या, क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग, तृतीयपंथी, एड्सग्रस्त, घटस्फोटीत अशा व्यक्तींवर लक्ष केंद्रित करुन त्यांना मदत करुन शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया १५ जानेवारी २०१८पर्यंत सुरु राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले.