पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल ३५ तास चालली. या संपूर्ण काळात मिरवणूक मार्गावर कानठळ्या बसवणारे डीजे वाजत होते. याबद्दल तुम्हाला कधीतरी काही वाटणार आहे की नाही? असा प्रश्न अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे शाखेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. पोलिस आयुक्तांनाही त्यांनी याबाबत कळवले असून तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे म्हटले आहे.
विसर्जन मिरवणूक झाली, त्यानंतर तो विषयही संपला. आता त्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही, मात्र ते ३५ तास आम्ही कसे काढले, आमच्या बरोबरच सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना काय त्रास सहन करावा लागला याचा विचार करण्याची जबाबदारी तुमचीच आहे व ती तुम्ही पार पाडत नाही, त्यामुळे आम्हाला बोलावे लागते आहे असे पंचायतीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विलास लेले यांनी म्हटले आहे. पंचायतीच्या विजय सागर, रवींद्र वाटवे, माधुरी गानू, अंजली देशमुख, वीणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंजली फडणीस, रवींद्र सिन्हा, अरुण नायर, विश्वास चव्हाण, सुनील नाईक, प्रकाश राजगुरू या पदाधिकाऱ्यांनीही हेच मत व्यक्त केले.
अंधत्व येईल असे लेझर लाईट आणि कानाचे पडदे फाटतील, हार्ट अटॅक येईल अशा ध्वनिक्षेपकांच्या भिंती हेच या मिरवणुकीतील चित्र होते. आम्ही बहुतेक जण डेक्कन परिसरातील रहिवासी आहोत. आधीच्या रात्रीचा त्रास व त्यानंतरही तब्बल ३५ तासांची विसर्जन मिरवणूक, या दरम्यान संपूर्ण शहरात प्रशासन शून्यवत होते, पोलिस गणेश दशर्नासाठी तुमच्याप्रमाणेच फौजफाटा घेऊन येणाऱ्या नेत्यांच्या बंदोबस्तात होते, मिरवणुकीत एकही पोलिस एकाही मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यालाही काहीही सांगण्याचे धाडस करत नव्हता. राज्य उत्सवाचा दर्जा, त्यासाठी आर्थिक मदत, कसलीही मागणी नसताना सलग ५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी हे सगळे निर्णय घेऊन या उन्मादाला तुम्ही प्रतिष्ठा देत आहात हे तुमच्या लक्षात येणार आहे की नाही? असा प्रश्न लेले व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. पुण्यात आम्ही निवडून दिलेला एकही लोकप्रतिनिधी याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. तुम्ही व पोलिस आयुक्त किमान दिलगिरी तरी व्यक्त कराल का अशी विचारणा लेले व सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.