डेपो बंद असतानाही हजार टन कचऱ्याची विल्हेवाट
By Admin | Updated: January 6, 2015 00:07 IST2015-01-06T00:07:51+5:302015-01-06T00:07:51+5:30
महापालिका प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्यामुळे ५0 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे.

डेपो बंद असतानाही हजार टन कचऱ्याची विल्हेवाट
पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असतानाही, महापालिका प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्यामुळे ५0 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. सोमवारी शहरामध्ये सुमारे १४९६ टन कचऱ्याची निर्मिती झाली. यापैकी सुमारे १ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी आज पुन्हा ग्रामस्थांची भेट घेतली; मात्र त्यावर काहीच तोडगा निघू शकला नाही.
काल सुमारे ४00 टन ओला कचरा शेतामध्ये जिरवण्यात आला. पालिका प्रशासन शहरामध्येच कचरा जिरवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. एकूण निर्माण झालेल्या कचऱ्यापैकी ३८८ टन शेतामध्ये, ८५ टन बायोगॅस, ६४ टन दिशा प्रकल्प, २८ टन विविध भागात जिरवला, २४५ टन कचरा रोकेश प्रकल्पामध्ये जिरवण्यात आला.
पुणे शहरातील कचरा प्रकल्पाला जिल्हयातील विविध ग्रामपंचायतींचा विरोध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेसुद्धा मोशी येथील जागा देण्यास पालिकेला विरोध केला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा मिळणे अवघड असल्यामुळे शहरातच कचरा जिरवावा लागणार आहे. यादृष्टीने पालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. येत्या ८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून कचरा डेपोच्या जागेसंदर्भात सकारात्मक निर्णय होणे तसेच ग्रामस्थांकडून महापालिकेस नवीन प्रकल्प उभारणीसाठी आणखी काही मुदत देण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
४आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नसल्यामुळे कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. शहरातील सुमारे आठशे कंटेनर काढण्यात आले आहेत. थेट नागरिकांकडून वर्गीकरण केलेला कचराच स्वीकारला जात आहे.
४महापालिका प्रशासनाकडून कचऱ्यासंदर्भात ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या अॅमिनिटी स्पेसच्या जागेमध्ये सुका कचरा जिरवण्यात येत आहे.