राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:46 PM2019-11-15T14:46:25+5:302019-11-15T14:47:49+5:30

निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली...

Discomfort among the candidates who are preparing for mpsc and upsc exam | राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता 

राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता 

Next
ठळक मुद्देस्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता

अमोल अवचिते- 
पुणे : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सरकार नोकरभरती काढणार का? संबंधित विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी प्राप्त होऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत  का? आदी प्रश्नांवरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. 
सर्वसामान्यपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये विभागातील असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार लोकसेवा आयोगाला मागणीपत्र प्राप्त होते. त्यानुसार रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊन परीक्षा घेतली जाते. डिसेंबर महिन्यात राज्यसेवा परीक्षेची जाहिरात येऊन फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात येते. मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे ही परीक्षा घेतली जाणार का? नव्याने जागा निर्माण करून भरती प्रक्रिया राबविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्यपाल नोकरशाहीवर दबाव टाकून घेतील का? नियोजित वेळापत्रकानुसार होणाºया परीक्षा योग्य वातावरणात पार पडतील का? अशा विविध प्रश्नांनी उमेदवारांना काळजीत टाकले आहे. यामुळे एकूणच अभ्यासावर परिणाम होत असल्याचे उमेदवारांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. युतीचे सरकार तरी येईल, असे वाटले होते. स्वत:च्या अहंकारापायी, वडिलांना दिलेल्या शब्दामुळे तसेच बंद खोलीत झालेल्या चर्चेमुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे मतदान करणाºया तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे.
.........
राज्यातल्या तरुणाईने मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याला एक स्थिर सरकार येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सत्तेच्या मोहापायी सर्वच पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे तरुणाईचे होणारे नुकसान कोण भरून देणार? लाखो तरुण रोजागाराच्या प्रतीक्षेत असताना राज्यामध्ये स्थिर सरकार नसणे ही महाराष्ट्राची अराजकतेकडे होणारी वाटचाल आहे का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे. - अमोल हिप्परगे, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी विद्यार्थी संघटना
............   
राष्ट्रपती राजवटी दरम्यान महाशिवआघाडीचे सरकार जर स्थापन होऊ शकले नाही, तर पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता आणि निवडणुकांमध्ये किती कालावधी जाणार हा देखील गंभीर प्रश्न आहे. या सर्व सत्ता घोळाचा परिणाम निष्पाप, प्रामाणिकपणे स्वत:चे भविष्य घडविणाºया तरुणाईला भोगावा लागणार आहे.  - नीलेश निंबाळकर, उमेदवार
.....
अस्थिर राजकीय व्यवस्थेमुळे लागू झालेली राष्ट्रपती राजवट  ही तरुणाईच्या आशा-अपेक्षांचा भंग झाल्यासारखी आहे. वाढती बेरोजगारी आणि रिक्त जागांची पदभरती यांमुळे मोठा अडथळा या परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. याचा फटका ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया असंख्य विद्यार्थ्यांना बसत आहे. - संकेत ठाकरे 
...........
महाराष्ट्रात आधीच एकीकडे दुष्काळ अन् एकीकडे बेरोजगारी वाढत असताना, राजकारणी लोक राज्याला स्थिर सरकार देऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आधीच्या सरकारने घोषित केलेल्या नोकरभरती पूर्ण होतील का नाही याची चिंता वाटत आहे. सरकार कोणी का स्थापन करू द्या पण बेरोजगार मुलांचे प्रश्न सोडवावेत हीच एक अपेक्षा आहे.- स्नेहा राऊत
.........
राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांचे मागणीपत्र राज्यपालांनी नोकरशाहीवर दबाव टाकून मान्य करून घ्यावे. तसेच नियोजित परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात. - सचिन लेंढवे.
................

Web Title: Discomfort among the candidates who are preparing for mpsc and upsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.