स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:01 IST2018-10-04T03:00:31+5:302018-10-04T03:01:07+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना: स्वाइन फ्लूवरील कार्यशाळेचे उद्घाटन

Disclose information on swine flu, information about the district collector | स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

पुणे : पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षपणे काम करावे. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहोचवण्यासाठी उपाय करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिल्या.

जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीने आयोजित ‘स्वाइन फ्लू आजारावर रोगनिदान उपचार व प्रतिबंध’ या कार्यशाळेत नवल किशोर राम बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य सहायक संचालक प्रदीप आवटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी वैद्यकीय अधिकारी सदाशिव जगदाळे उपस्थित होते.
स्वाइन फ्लू या आजारावरील उपचारांची अंमलबजावणी करत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून नवल किशोर राम म्हणाले, स्वाइन फ्लू या आजारावर करत असलेल्या उपचार पद्धतीच्या वस्तुनिष्ठ अहवालाची नोंद सर्वांकडे असणे आवश्यक आहे. वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्यविषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे.
स्वाइन फ्लू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित कराव्यात. तसेच शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या.

Web Title: Disclose information on swine flu, information about the district collector