खासगी बसमध्ये त्रुटी आढळल्यास थेट जप्तीची कारवाई होणार; आरटीओची विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:09 IST2023-07-04T09:08:56+5:302023-07-04T09:09:32+5:30
तपासणीदरम्यान, दंडात्मक व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले...

खासगी बसमध्ये त्रुटी आढळल्यास थेट जप्तीची कारवाई होणार; आरटीओची विशेष मोहीम
पुणे : समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओ कार्यालयाकडून खासगी बस तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत प्रत्येक खासगी बसची तपासणी केली जाणार असून, यात छोट्या-छोट्या गोष्टींची पडताळणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान, दंडात्मक व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावर नुकताच विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कडक पवित्रा घेतला असून, पुणे आणि परिसरातील सर्व खासगी बसच्या तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.