पुण्याहून नवीन विमानसेवा सुरू करणे कठीण : कुलदीप सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 02:06 PM2020-03-01T14:06:39+5:302020-03-01T14:12:01+5:30

विविध देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय शहरांशी पुणे जोडले जावे, असे आम्हालाही वाटते.

Difficult to start a new airline from pune : Kuldeep Singh dak | पुण्याहून नवीन विमानसेवा सुरू करणे कठीण : कुलदीप सिंग

पुण्याहून नवीन विमानसेवा सुरू करणे कठीण : कुलदीप सिंग

Next
ठळक मुद्देहवाई दलासह शासनाकडेही जमिनीची मागणी प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टपुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) वातानुकूलित ई-बस सुरू करण्यासाठी प्रयत्न हवाई दलाची बंधने पाहता दिवसाला १७० विमान उड्डाणांची मर्यादा ओलांडणे खूप कठीणप्रवाशांची गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही बंधने नसलेले नवीन विमानतळ होणे आवश्यक

राजानंद मोरे - 
पुणेविमानतळाचे संचालक म्हणून कुलदीप सिंग यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पुणेविमानतळावर प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन विमानसेवा सुरू करणे, टर्मिनल व पार्किंग इमारतीचे काम वेगाने पूर्ण करणे अशी विविध आव्हाने आहेत. याविषयी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
----------
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन विमानसेवा सुरू करण्याविषयी काय सांगाल? 
पुणे विमानतळ हे हवाई दलाचे आहे. विमान कंपन्यांची पुण्यासाठी मागणी खूप असली तरी हवाई दलाला पहिले प्राधान्य देणे आवश्यक आहे. पुण्याचा विकास खूप वेगाने होत आहे. त्यामुळे प्रवाशांची मागणी वाढत आहे. पण हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊनच प्रवासी उड्डाणांचे नियोजन करावे लागते. पण सध्याची धावपट्टीची क्षमता आणि हवाई दलाची बंधने पाहता दिवसाला १७० विमान उड्डाणांची मर्यादा ओलांडणे खूप कठीण आहे. उन्हाळ्यासाठी आठवड्याला १३४३ उड्डाणांचे विनंती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) आल्या आहेत. पण त्या पूर्ण करणे शक्य नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही बंधने नसलेले नवीन विमानतळ होणे आवश्यक आहे. 
--------------
नवीन विमानसेवा सुरू करण्यात कोणत्या अडचणी आहेत?
विविध देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय शहरांशी पुणे जोडले जावे, असे आम्हालाही वाटते. पण त्याला काही मर्यादा आहेत. आमची सेवा रेल्वेसारखी नाही. रेल्वेच्या गाड्या, मार्ग, थांबे त्यांचेच असतात. पण विमानक्षेत्रामध्ये विमानतळ एकाचे आणि विमाने दुसºया कंपनीची असतात. पुणे विमानतळ हवाई दलाचे असल्याने काही बंधने आहेत. तसेच हवाई उड्डाणांना मान्यता देणारी यंत्रणा आहे. विमानतळ, धावपट्टीची क्षमता पाहून परवानगी दिली जाते. आम्ही विमान कंपन्यांना नवीन उड्डाणांसाठी विनंती करू शकतो. पण याचा निर्णय आमच्या हातात नाही.
------------
विमानतळावर सुधारणांबाबत कशाला प्राधान्य असेल?
प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे ही प्राथमिकता आहे. प्रामुख्याने विमानतळावर खानपानाची सुविधा दर्जेदार असावी. सर्व स्तरांतील प्रवाशांच्या क्षमतेनुसार आणि आवडीनिवडीनुसार त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अरायव्हल, डिपार्चर, सिक्युरिटी होल्ड एरियामध्ये किमान एक आऊटलेट अशा प्रकारचे केले जाईल. तसेच स्वच्छतागृहांची स्थितीही चांगली असायला हवी. टर्मिनल इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवाशांना आपण एका चांगल्या ठिकाणी आल्यासारखे वाटायला हवे. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रस्त्यासोबतच मेट्रोची सुविधाही असायला हवी, अशी अपेक्षा आहे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) वातानुकूलित ई-बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
----------
जमिनीअभावी सध्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत?
हवाई दलासह शासनाकडेही जमिनीची मागणी केली आहे. ही जमीन मिळाल्यानंतर इतर प्रश्न मार्गी लागतील. माल (कार्गो) वाहतुकीसाठीही मागणी वाढत आहे. पण कार्गो टर्मिनल सध्याच्या नवीन इमारतीच्या जागेत येतेय. हे टर्मिनलही हलवावे लागणार आहे. पण त्यासाठीही जागा नाही. त्यामुळे लवकरात लवकर जागा मिळावी, यासाठी प्रयत्न करतो. जमीन मिळाल्यानंतर हे टर्मिनल हलविता येईल. नवीन टर्मिनल इमारतीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या इमारतीतूनच काम सुरू ठेवावे लागणार आहे. विमानतळावर येणाºया प्रवाशांच्या वाहनांना पार्किंगसाठी मल्टिलेवल कार पार्किंगच्या इमारतीचे कामही सुरू आहे. सध्याच्या पार्किंगच्या जागेतच हे काम सुरू आहे. त्यामुळे पार्किंगला समस्या निर्माण होत आहेत. यापुढील काळात ही समस्या काम पूर्ण होईपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी खासगी वाहन न आणता बस, कॅब, रिक्षा या वाहनांचा अधिक वापर करायला हवा.
------------

Web Title: Difficult to start a new airline from pune : Kuldeep Singh dak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.