‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:47 IST2025-07-04T19:46:58+5:302025-07-04T19:47:37+5:30
जय गुजरात या घोषणेने शिंदेंचे गुजरातवर जास्त प्रेम आणि मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही

‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी स्तुतिसुमने उधळण्याबरोबरच त्यांना खुश करण्यासाठी भाषणाच्या समारोपात ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण करून गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर जास्त प्रेम आणि मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही, असा पलटवार केला आहे.
सध्या राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असतानाच शुक्रवारी (दि. ४) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोंढवा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे व अजित पवारही उपस्थित होते. भाषणात त्यांनी अमित शाह यांचे तोंड भरून कौतुक केले, पण भाषण संपवताना शिंदे ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणाले. त्यानंतर ते क्षणभर थांबले नि परत माईककडे येऊन ‘जय गुजरात’चा नारा दिला.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या घोषणेबाबत विचारले असता, त्यांनी शरद पवार यांच्याही एका घोषणेचा दाखला दिला. याआधी एकदा चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांची पाठराखण केली. संपूर्ण भारतातील मोघल सत्ता घालवण्याची आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकावण्याचं काम मराठी माणसांनी केलं. मग एवढा संकुचित विचार जर कोणी करत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.