"देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:58 PM2024-03-26T17:58:25+5:302024-03-26T18:13:16+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे.

Devendra Fadnavis is welcome in Baramati, but I have modest expectations from him, Supriya sule on election | "देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा"

"देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा"

मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र, राज्यातील बहुतांशी जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असून या उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे, सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात गाठीभेटी, गावदौरे करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका गावदौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. 

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अजित पवार यांच्या विरोधातही महायुतीतील काही नेते मैदानात उतरले आहेत. दौंड मतदारसंघातून विजय शिवतारे तर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मात्र, महायुतीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होणार आहेत. त्याच अनुषंगाने सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बारामतीमध्ये स्वागत असल्याचे म्हटले. 

तुम्हाला हरवणं हाच नेतेमंडळींचा उद्देश आहे. पण, त्यांच्यातही मतभेद आहेत. याच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस हेही बारामतीत येणार आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, अतिथी देवो भवं... म्हणत त्यांचं बारामतीमध्ये स्वागतच आहे, असे खा. सुप्रिया सुळेंनी म्हटले. 

माझी त्यांच्याकडून एकच माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे, त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून टाकावा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तसेच, दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढावा, एखाद दोन नोकरीचे मोठे प्रकल्प येथे आणावेत, सिलेंडरचा भाव कमी करावा, आम्हाला हमी भाव त्यांनी द्यावा, दिल्लीला एकदा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावं, अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी फडणवीसांकडून व्यक्त केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचं स्पष्ट केलं. महादेव जानकर महायुतीत आले असले तरी बारामतीत तुमच्याच मनातील उमेदवार दिला जाईल, असेही अजित पवारांनी म्हटलं. त्यामुळे, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजाय असाच राजकीय सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. 
 

Web Title: Devendra Fadnavis is welcome in Baramati, but I have modest expectations from him, Supriya sule on election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.