घर खरेदीदारांच्या तक्रार निवारणासाठी विकासकांनी स्थापन करावा ‘तक्रार निवारण कक्ष; 'महारेरा'चे आवाहन
By नितीन चौधरी | Updated: August 16, 2023 17:10 IST2023-08-16T17:07:34+5:302023-08-16T17:10:31+5:30
विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केली आहे...

घर खरेदीदारांच्या तक्रार निवारणासाठी विकासकांनी स्थापन करावा ‘तक्रार निवारण कक्ष; 'महारेरा'चे आवाहन
पुणे : घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ‘तक्रार निवारण कक्षाची’ स्थापना करावी, असे आवाहन महारेराने केले आहे. या कक्षात तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्पस्थळी ठळकपणे प्रदर्शित करावे. तसेच विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केली आहे.
सुरूवातीला घरखरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची मार्केटिंग यंत्रणा ग्राहकांच्या संपर्कात असते. नंतर काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते. अशावेळी त्या ग्राहकाने कुठे जावे, हे त्याला कळत नाही. परिणामी, त्याची तक्रार सोडवून घेण्यात त्याला अडचणींना सामोरे जावे लागते. यातून अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्ण करण्यातही अडचणी येऊ शकतात.
यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्यास, तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळणार असल्याने हा प्रश्न नियंत्रणात राहू शकतो, असे महारेराच्या निदर्शनास आलेले आहे. तसे अभिप्रायही महारेराला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्राप्त झालेले आहेत. त्यासाठी महारेराने परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना समर्पित ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. या विकासकांनी किती तक्रारी आल्या किती तक्रारींचे निवारण केले, याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकावा. यामुळे प्रकल्पाची विश्वासार्हता वाढायला मदत होणार आहे.
जानेवारीपासून महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पांचे मानांकन काही निकषांच्या आधारे जाहीर करण्याचे महारेराने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यात प्रकल्पनिहाय समर्पित तक्रार निवारण कक्षाची स्थापना हाही महत्त्वाचा निकष राहील, असे महारेराने जाहीर केले आहे.