भाजप राष्ट्रवादीत युती असूनही होणार वर्चस्वासाठी लढाई; शिंदे गट जास्तीत जास्त जागा मिळवणार?

By राजू इनामदार | Updated: June 11, 2025 19:45 IST2025-06-11T19:44:25+5:302025-06-11T19:45:32+5:30

महापालिका निवडणूक महायुती म्हणून झाली तर त्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचीच मोठी लढाई होणार असून शिंदे गट फायदा करून घेण्याची शक्यता आहे

Despite the alliance with BJP and NCP there will be a battle for supremacy Will eknath Shinde group win maximum seats | भाजप राष्ट्रवादीत युती असूनही होणार वर्चस्वासाठी लढाई; शिंदे गट जास्तीत जास्त जागा मिळवणार?

भाजप राष्ट्रवादीत युती असूनही होणार वर्चस्वासाठी लढाई; शिंदे गट जास्तीत जास्त जागा मिळवणार?

पुणे: महापालिका निवडणुकीत महायुती असली किंवा नसली तरीही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात वर्चस्वाची लढाई होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्ष आतापासूनच त्यासाठी सज्ज झाले असून भाजपला सत्ता राखण्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेले वर्चस्व परत मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे. यात युतीमध्ये असलेला शिवसेना (एकनाथ शिंदे) गट आपला फायदा करून घेण्याची शक्यता आहे.

महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अजूनतरी झालेला नाही. अजित पवार यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मताला महत्व दिले जाईल असे जाहीर केले आहे. भाजपने मात्र यावर अद्याप तरी कसलेही जाहीर मतप्रदर्शन केलेले नाही. मात्र अजित पवार यांचा कोणताही दबाव पक्षश्रेष्ठींनी सहन करू नये अशी मागणीच करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या झगड्यात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शिंदे गटाकडून होईल असे दिसते आहे.

महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे तीन प्रमुख पक्ष आहेत. त्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) (आठवले गट) व अन्य काही पक्ष युतीमध्ये आहेत. त्यातील आरपीआय भाजपबरोबर असल्याने त्यांना त्यांच्या कोट्यातून जागा द्याव्या लागतील. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुणे महापालिकेवर वर्चस्व मिळवले होते व ते टिकवलेही होते. काँग्रेसला बरोबर घेत त्यांनी महापालिकेतील सत्ता राखली होती.

मात्र भाजपने त्यांच्या या वर्चस्वाला सुरूंग लावला. एकहाती ९८ जागा जिंकून त्यांनी प्रथमच महापालिकेची सत्ता मिळवली. राज्यात सत्ता असल्याने चारचा प्रभाग, सोयीची प्रभागरचना अशा अनेक गोष्टी करून घेतल्याने त्यांचा फायदा झाला. त्यावेळी अजित पवार काहीही करू शकले नाहीत. सलग ५ वर्षे भाजपने सत्ता राखली. दिल्लीत, राज्यात व महापालिकेतही अशा तिहेरी सत्तेचा उपयोग करत त्यांनी शहरातील संघटन मजबूत केले आहे. महापालिकेतील एकहाती सत्तेची चव घेतल्यामुळे त्यांना आता पुन्हा ही सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात घरघर मोदीपासून हरघर तिरंगा यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

दुसरीकडे अजित पवार यांनाही महापालिकेत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत. पालकमंत्री आहेत. भाजपत त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्याचा फायदा घेत जागा वाटपात ते भाजपला मात देतील अशी चर्चा आहे. विसर्जित महापालिकेत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ जागा होत्या. त्यातील बहुसंख्य उपनगरांमध्ये होत्या. मात्र आता सत्तेचा उपयोग करत त्यांनी शहराच्या मध्यभागातही संघटन तयार केले आहे. त्याचा उपयोग करून ते जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. जागा निहाय विचार करूनच वाटप व्हावे असा त्यांचा त्यासाठीच प्रयत्न आहे. त्यामुळेच महापालिका निवडणूक महायुती म्हणून झाली तर त्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचीच मोठी लढाई होईल असे बोलले जात आहे.

या सगळ्यात शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचा प्रयत्न जास्तीतजास्त जागा मिळवण्याचा आहे. एकत्रित शिवसेनेचे विसर्जित महापालिकेत ९ नगरसेवक होते. आता त्यापेक्षा जास्त जागा मागण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच त्यांनी महापालिकेच्या राजकारणात मुरलेले माजी आमदार रविंद्र धंगेकर यांना महानगर प्रमुख करत त्यांच्याकडे धुरा सोपवली आहे. जागा वाटपाच्या चर्चेत ते पक्षाचा नक्की फायदा करून घेतील असा शिंदेसेनेला विश्वास वाटतो आहे.

Web Title: Despite the alliance with BJP and NCP there will be a battle for supremacy Will eknath Shinde group win maximum seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.