पुणे : फिनेल प्यायल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीतील आरोपीने रुग्णालयातून पलायन केले. शुक्रवारी (दि.२९) पहाटे ४.३० ते ५.३० दरम्यान ससून रुग्णालयात हा प्रकार घडला. आरोपी पळून गेल्याने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार किशोर औताडे (रा. पोलीस लाईन, शिर्डी) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खुनासह इतर गुन्हे दाखल असलेला हा आरोपी २७ नोव्हेंबर २०२० पासून कोपरगाव सबजेल (जि. अहमदनगर) येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. २७ जानेवारी २०२१ ला रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिनेल प्यायल्याने त्याला उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला जिल्हा रुग्णालय, अहमदनगर आणि त्यानंतर ससून रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले. त्याला गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ५.३० वाजता ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांच्या कायदेशीर रखवालीतून तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर तपास करीत आहेत.
.....