शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST

-सुकृत करंदीकर कालच्या रविवारी कोपा अमेरिकाच्या स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना परस्परांविरुद्ध लढले. विम्बल्डनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचसमोर इटलीच्या मटेरो बेरेटिनीचे ...

-सुकृत करंदीकर

कालच्या रविवारी कोपा अमेरिकाच्या स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना परस्परांविरुद्ध लढले. विम्बल्डनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचसमोर इटलीच्या मटेरो बेरेटिनीचे आव्हान होते. त्यानंतर युरो २०२० फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच पोहोचलेला साहेबांचा संघ इटलीचा मुकाबला करणार होता. कोरोनाच्या गेल्या सुमारे दीड वर्षांच्या मळभानंतर या तिन्ही अंतिम सामन्यांचा थरार रविवारी जगाने लुटला. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी जगभरच्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत, पण त्याच्या जादुई कारकिर्दीला शाप होता, तो म्हणजे स्वत:च्या देशासाठी तो एकही स्पर्धा जिंकून देऊ शकलेला नव्हता. या एकाच कारणामुळे पेले, मॅराडोना, रोनाल्डो या दिग्गजांच्या मांदियाळीत त्याला स्थान मिळत नव्हते. ‘कोपा अमेरिका’ची अंतिम फेरी जिंकून मेस्सीने हा काळा डाग कायमचा पुसला. वर्षावर येऊन ठेपलेल्या फुटबॉल विश्वचषकात काळजावरचा अपयशाचा दगड कायमचा दूर केलेल्या मेस्सीचे ताजेतवाने, आत्मविश्वासाने भरलेले रूप आता दिसेल अशी खात्री त्याच्या चाहत्यांना आहे.

विम्बल्डनमध्ये जोकोविच विरुद्ध बेरेटिनीचा सामना सुरू झाला तेव्हा जोकोविचच्या एकतर्फी विजयाची अपेक्षा होती. साडेसहा फूट उंचीचा बेरेटिनी अवघ्या २५ वर्षांचा. जोकोविच त्याच्यापेक्षा तीन इंचाने बुटका शिवाय वयाने नऊ वर्षांनी मोठा. बघता बघता बेरेटिनीच्या उसळत्या तारुण्याने आणि दमदार ताकदीने जोकोविचपुढे आव्हान निर्माण केले. इतके तीव्र की मागे पडल्यानंतरही जोकोविचला वारंवार गाठणाऱ्या बेरेटिनीने जोकोविचची एरवीची बर्फासारखी थंड शांतताही भंग केली. पण अखेरीस योगसाधनेतून कमावलेला मनोनिग्रह, जोश आणि अनुभव जोकोविचच्या कामी आला. बेरेटिनीची जबरदस्त झुंज त्याने संपवली. पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकण्याचे इटलीचे स्वप्न भंगले. संपूर्ण स्पर्धेत जोकोविचने फक्त दोन सेट गमावले. बेरेटिनीला हरवून त्याने स्वत:च्या एकूण ग्रँडस्लॅमची संख्या वीसवर नेली. राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या तीन टेनिसपटूंच्या ग्रँडस्लॅमची प्रत्येकी संख्या वीस आहे. एकाच कालखंडातल्या या तीन सार्वकालिक महान टेनिसपटूंनी एकत्रितपणे साठ ग्रँडस्लॅम जिंकल्या यावरून त्यांची मातब्बरी आणि एकमेकांसमोर उभे केलेले कडवे आव्हान लक्षात यावे. या यशोशिखराची उंची जोकोविच आणखी वाढवणार. तो थांबणारा नाही. कोण्या एकेकाळी सर्बियातला एक सात वर्षांचा सामान्य मुलगा घरात विम्बल्डन चषकाची प्रतिकृती ठेवून या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहात होता. तोच मुलगा ही स्पर्धा केवळ खेळला नाही तर जिंकला. एकदा नव्हे तर सहादा. हा मुलगा म्हणजेच आजचा ‘सुपरनोव्हा’...नोवाक जोकोविच. कणखर मानसिकता, धुरंदर रणनीतिज्ञ आणि प्रचंड क्षमतेचं न थकणारं शरीर हे सगळे जोकोविचने प्रचंड मेहनतीने कमावले आहे.

फुटबॉल हा शारीरिक क्षमतांचा कस पाहणारा खेळ आहे. टेनिसमध्येही जगज्जेतेपद टिकवून ठेवायचे तर प्रचंड दम लागतो. वयाची तिशी ओलांडली की या दोन्ही खेळांमधली घसरगुंडी सुरू होते. पण ३४ वर्षांचा जोकोविच त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांनी तरुण खेळाडूंना ज्या चपळाईने आणि कणखरपणे नमवतो ते अनुभवणे प्रेरणादायी ठरते. इटली विरुद्ध इंग्लंड या ‘युरो फुटबॉल फायनल’मध्येही हेच दिसले. अवघ्या दुसऱ्या मिनिटाला इंग्लंडने इटलीची भक्कम बचाव फळी भेदत गोल केला तेव्हा ‘कमिंग होम’चे स्वप्न सत्यात उतरणार अशीच लहर संपूर्ण इंग्लंडमध्ये पसरली. पण या गोलनंतर इटलीच्या कथित ‘म्हाताऱ्या’ संघाने ज्या वेगवान चढाया करून इंग्लंडची दमछाक तो थरार अफलातून होता. इटलीच्या जोरदार मुसंड्यांनी इंग्लंडची तरुण फळी हतबल झाली. घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याचा तणाव इंग्लिश खेळाडूंच्या देहबोलीत दिसत होता. त्या उलट इटलीचे तिशी ओलांडलेले खेळाडू सातत्याने धडका देत राहिले. ‘पेनल्टी शूटआउट’मध्ये तणावाने जेव्हा परिसीमा गाठली तिथे इंग्लिश खेळाडू पुरते ढासळले. जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा दारुण स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. यात दमदार, अनुभवी आणि संयमी पुरुषांनी त्यांना आव्हान देणाऱ्या ताकदवान, वेगवान आणि कौशल्यपूर्ण पोरांचा सपशेल पराभव केला.