पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी अखेर शुक्रवारी (दि. १०) सुनावणीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून हजर झाले. न्यायाधीशांनी त्यांना नाव विचारले असता गांधी यांनी नमस्कार केला आणि आपले नाव सांगितले. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे ते न्यायाधीशांसमोर बसून होते. न्यायालयानेराहुल गांधी यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी न्यायाधीशांना 'थँक्यू' म्हटले.
न्यायालयाने पुढील खटल्याच्या सुनावणीची तारीख १८ फेब्रुवारी दिली आहे. मात्र, राहुल गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना प्रत्येक तारखेला हजर राहणे शक्य होणार नाही. ते केवळ खटल्याच्या निकालादिवशी येतील, असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी सादर केला. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर होण्याकरिता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. १०) मुदतवाढ दिली होती. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असल्याने पुण्याच्या न्यायालयात हजर करायचे झाले तर त्यांना हाय सिक्युरिटी आहे. त्याने न्यायालयाच्या कामकाजात अडथळा येण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यासाठी न्यायालयात सकाळी अर्ज केला होता. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी विरोध दर्शविला. अर्जावर दोन ते तीन तास चर्चा झाली. न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर राहुल गांधी यांना न्यायालयाची मेलद्वारे लिंक पाठविण्यात आली. गांधी हे ४:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायालयासमोर हजर झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने ॲड. पवार यांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. माजी आमदार मोहन जोशी हे त्यांचे जामीनदार राहिले. न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केल्यावर गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानले.
न्यायालयाने पुढील तारीख १८ फेब्रुवारी दिली आहे. पण आता राहुल गांधी यांना खटल्याला उपस्थित राहण्याची गरज नाही. यापुढे आमचे वकील न्यायालयात हजर राहतील, असे गांधी यांनी न्यायालयात सांगितले आहे. - ॲड. मिलिंद पवार, राहुल गांधी यांचे वकील
राहुल गांधी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यास आम्ही विरोध केला. मात्र ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली. - ॲड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील