शिक्रापूर : पाणी आणण्याकरिता गेलेल्या युवतीचा पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी शिरुर तालुक्यातील धामारी येथे घडली. शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. तेजल सुनील वाघमारे (वय १९, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. तिने पाबळ येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. तिच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झालेले असून आई चंचला व लहान भावासह ती धामारी येथील दलित वस्तीमध्ये राहत होती. ती रविवारी जवळच असलेल्या शेततळ्यावर पाणी आणण्याकरिता गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तळ्याकडे धाव घेतली. शोधाशोध करत असताना तिच्या चपला तळ्याच्या कडेला पडलेल्या दिसल्या. पाण्यामध्ये तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आले. पोलीस पाटील आत्माराम डफळ यांनी पोलिसांना माहिती दिली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदानंद शेलार यांच्या सुचनांनुसार हवालदार संजय डावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेजलचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. काही वर्षांपुर्वी येथील हातपंपावर पाणी हापसत असताना भीवाजी मोहिते यांचा मृत्यू झाला होता.
शिक्रापूर येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 14:50 IST
जवळच असलेल्या शेततळ्यावर पाणी आणण्याकरिता युवती गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तळ्याकडे धाव घेतली.
शिक्रापूर येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू
ठळक मुद्देधामारी येथील घटना : पाणी आणण्यासाठी गेली असता घडली दुर्घटना