जिवंत असताना जागामालकाला दाखविले मयत,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:43+5:302021-02-05T05:14:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जागामालक जिवंत असताना मयत झाल्याचे नमूद करून एकतर्फी दस्त नोंदवून जिल्हा मुद्रांक अधिका-याकडून प्रमाणपत्र ...

Death shown to landlord while alive, | जिवंत असताना जागामालकाला दाखविले मयत,

जिवंत असताना जागामालकाला दाखविले मयत,

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जागामालक जिवंत असताना मयत झाल्याचे नमूद करून एकतर्फी दस्त नोंदवून जिल्हा मुद्रांक अधिका-याकडून प्रमाणपत्र मिळवून त्यांची मिळकत बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजाराम पुणेकर (रा. रेणुकास्मृती, हिंगणेहोम कॉलनी, कर्वेनगर) आणि मीना पुणेकर, नातू चेतन पुणेकर अशी गुन्हा दाखल केल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश रामभाऊ कानगुडे (वय ४४, रा. मुळशी खुर्द) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : कानगुडे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये बळवंत महादेव दातार (रा. कोथरुड) यांच्याकडून महर्षीनगर, कर्वेनगर येथील सुमारे १६ हजार चौरस फूट मिळकत विकत घेतली. तसा कुलमुख्यत्यार दस्त हवेली सबरजिस्ट्रार कार्यालयात नोंदविला आहे. त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता त्यांना या मिळकतीपैकी १० हजार चौरस फूट जागा १९८४ साली बळवंत दातार यांनी राजाराम पुणेकर यांना दर वर्षी ११०० रुपये प्रमाणे ९९ वर्षांसाठी भाडेकराराने दिली होती. मात्र, २०००पासून पुणेकर यांनी दातार यांना मिळकतीचे भाडे दिले नसल्याने तसेच या मिळकतीला लागून असलेल्या ७ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून स्वत:च्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केल्याने दातार यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणेकर यांना हा करारनामा रद्द झाल्याबाबत नोटीस पाठविली त्याला पुणेकर यांनी उत्तर देताना त्यांच्या ताब्यात २० हजार चौरस फूट क्षेत्र असल्याची नोटीस दातार यांना पाठवली. पुणेकर यांनी २३ एप्रिल २००८ रोजी हवेली सबरजिस्ट्रार यांच्या कार्यालयात खोट्या मजकुराचे घोषणापत्र लिहून नोंदविले. त्यात बळवंत दातार हे मयत झाले आहेत. असे नमूद केले आहे. हा दस्त एकतर्फी नोंदवून घेतला. तसे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याचा उपयोग घोषणापत्र तयार करताना केला. बळवंत दातार हे अद्यात जिवंत असून देखील पुणेकर यांनी त्यांचे खोटे घोषणापत्र तयार करुन त्यावर मीना पुणेकर व चेतन पुणेकर यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. असे फिर्यादीत म्हटले आहे.

खडक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

Web Title: Death shown to landlord while alive,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.