हृदयद्रावक! काल आई गेली अन् आज वडिलांचं छत्र हरपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 19:56 IST2018-10-05T17:11:02+5:302018-10-05T19:56:00+5:30
नशीब कधी कोणाला कोणत्या वळणावर आणून सोडेल सांगता येणे कठीण आहे.

हृदयद्रावक! काल आई गेली अन् आज वडिलांचं छत्र हरपलं
पुणे : नशीब कधी कोणाला कोणत्या वळणावर आणून सोडेल सांगता येणे कठीण आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत झालेल्या अपघातामुळे परदेशी भावंडांनी आपला उरला-सुरला आधारही गमावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन व्यक्ती ठार झाल्या आहेत. त्यात शिवाजी परदेशी या रिक्षाचालकाचा समावेश आहे.
परदेशी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाना पेठ भागात राहते. दुर्दैवाने परदेशी यांच्या कुटुंबात गेल्या 48 तासांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. कालच शिवाजी यांच्या पत्नी प्रीती यांचे केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी शिवाजी स्वतःच्या रिक्षात आई, आत्या, दोन मुलं आणि मित्रासह आळंदीला गेले होते. विसर्जन झाल्यावर दुःखी अंतःकरणाने ते पुण्याकडे परतत होते. मात्र रस्त्यात मंगळवार पेठेत रिक्षा चाललेली असतानाच होर्डिंग कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
परदेशी यांना दोन मुले असून मुलगी समृद्धी 18 वर्षांची तर मुलगा समर्थ अवघ्या 4 वर्षांचा आहे. ही दोघेही अपघातात किरकोळ जखमी आहेत. परदेशी यांच्या मातोश्रींनाही किरकोळ दुखापत झाली आहे. आई आणि वडील दोन दिवसात गमावलेल्या या मुलांसमोर घटनेने मात्र आयुष्यभराचा अंधार दाटला आहे.
या अपघातात देहूरोडमधील भगवानराव धोत्रे(48), पिंपळे गुरवमधील भीमराव कसार (70), नानापेठेतील शिवाजी परदेशी(40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे. तर उमेश धर्मराज मोरे (36), किरण ठोसर (45), यशवंत खोबरे (45), महेश वसंतराव विश्वेशवर (50), रुक्मिनी परदेशी (55) हे गंभीररीत्या जखमी असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तर समर्थ परदेश(4), समृद्धी परदेशी(18) यांना किरकोळ दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
VIDEO: पुण्यात 'असं' कोसळलं लोखंडी होर्डिंग, CCTV फुटेज पाहून हादराल! #Punepic.twitter.com/tJVEgIL7zf
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 5, 2018