पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२३) दुपारी ३:३० वाजता हल्ला झाला आणि या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे वृत्त वेगाने पसरले. बुधवारी दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच पुणेकरांचे मन हेलावले. त्यानंतर आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहाजण दगावल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांशी संवाद साधला.
पतीला गमावले
पहलगाम दहशतवादी घटनेत अजाण म्हणायला लावून गणबोटे यांना गोळ्या घालण्यात आल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. या अतिरेक्यांनी फक्त पुरुषांना मारलं. त्यांनी आम्हा बायकांना काहीच केलं नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. या हल्ल्यात त्यांनी पतीला गमावले.
३ गोळ्या लागल्या अन् मृत्यू
काश्मीरमध्ये पहलगाममध्ये त्या उंच जागेवर फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. तेव्हा लोक पळायला लागली. आम्ही टेंटमध्ये लपलो. गणबोटे काका खाली झोपले होते. अनेक लोक लपली होती. अनेक लोकांवर फायरिंग झाली. एकजण आमच्याकडे आला. त्याने आम्हाला पकडून गोळ्या मारायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना ३ गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषानं मारलं. त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली. मला तिथ चक्कर आली होती. त्यानंतर मिलिटरी पोहचली होती. सगळ्या जखमी लोकांना श्रीनगर मध्ये शिफ्ट केलं गेल होत. रात्री १२ वाजता कळलं की काही जणांचा मृत्यू झाला. आम्हाला ओळख पटविण्यासाठी नेण्यात आलं मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाल्याचे असावरी जगदाळे हिने सांगितले होते.