’दलितमित्र’ अनुताई भागवत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 08:39 PM2019-09-13T20:39:18+5:302019-09-13T20:39:43+5:30

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती..

The death of 'Dalit Mitra' Anutai Bhagwat | ’दलितमित्र’ अनुताई भागवत यांचे निधन

’दलितमित्र’ अनुताई भागवत यांचे निधन

googlenewsNext

पुणे : समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबददल ’दलितमित्र’ पदवी मिळवलेल्या ज्येष्ठ समाजसेविका अनुताई भागवत यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. अमरावतीच्या ‘तपोवन’चे संस्थापक कै. शिवाजीराव पटवर्धन आणि पार्वतीबाई पटवर्धन यांच्या त्या कन्या होतं. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 अनुताई भागवत हे अवघ्या महाराष्ट्राला सेवाकार्यासाठी सुपरिचित असलेले नाव आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आई-वडिलांकडूनच त्यांना समाजसेवेचा वारसा मिळाला. लहानपणीच महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई, दुर्गाबाई देसाई यांच्यासारख्या महान विभुतींचा त्यांना सहवास लाभला. सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, साने गुरूजी यांची विचारधारा त्यांच्यात रूजली होती. मानवतेला पारख्या झालेल्या कुष्ठरूग्णाला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन घालविण्यास पात्र करण्यासाठी, रोगाविषयीची भीती, घृणा व तिरस्कार नाहीसा करण्यासाठी मानवतावादी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी ‘तपोवन’ केंद्राची स्थापना केली होती. पती निधनानंतर अनुताई भागवत यांनी तपोवनमध्ये प्रवेश करून कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा ध्यास घेतला. अनाथांचा सांभाळ, कैदी बांधवांच्या निराधार मुलांना आश्रय, अपंगांचे पुनर्वसन, तपोवन वस्तू विक्री केंद्र, अनौरस मुलांचे दत्तकविधान या सर्व कार्यात त्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले. स्नेहप्रकाश परिवाराच्या माध्यमातूनही त्यांनी अपंगांसाठी काम केले. कोल्हापूरच्या  ‘हेल्पर्स आॅफ दि हँण्डिकँप्ड’ या संस्थेच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी त्या होत्या. 
समाजसेवेतील योगदानाबददल 1972 मध्ये गांधीजयंतीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती. कै.शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचा जीवनपट अनुताईंनी ’बिल्बदल’मधून साकारला. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले. नँशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात मराठी विभागातील 48 आत्मचरित्रात्मक पुस्तकात उत्कृष्ट पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव झाला.  महाराष्ट्र शासनातर्फे लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही या पुस्तकाने मिळविला. ‘इदं न मम’ ग्रंथ व ‘सागर शक्ती आकाशी’ हे त्यांनी लिहिलेले नाटकही खूप गाजले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे ॠणानुबंध होते. 
 

Web Title: The death of 'Dalit Mitra' Anutai Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे