पुणे: दर्शना पवार हत्याप्रकणानंतर पुण्यात मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यातच सदाशिव पेठेतील थरारक घटनेने तर शहरात खळबळ माजवली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेत शंतनू जाधव या माथेफिरूने तरुणीचा पाठलाग करून कोयत्याने वार करत संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने या नराधमाने टोकाचे पाऊल उचलले. अक्षरशः भरदिवसा कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता त्याने तरुणीवर कोयत्याने वार केले. आजूबाजूला असणाऱ्या अनेकांनी याक्षणी बघ्यांची भूमिका घेतली होती. पण अशातच लेशपाल जवळगे, हर्षद पाटील यांनी जीवाची परवा न करता या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. मोठे धाडस करून त्या तरुणाला पकडून इतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणानंतर लेशपालचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. कारण त्याने या थरारक घटनेत शंतनूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या बॅग फेकण्याचे धाडस केले होते. अशातच त्याने ठेवलेली इन्स्टा स्टोरी चर्चेत आली आहे.
लेशपाल जवळगे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सांगतोय की, “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला.”
मी फक्त माझं कर्तव्य बजावलं
''सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय... मी त्या ताईवर उपकार नाहीत केले मी माझं कर्तव्य पार पाडलं ... तरीही सर्वांचे खुप खूप आभार आहेत. तर या घटनेनंतर खूप फोन येत आहेत. सगळे सत्काराला बोलवत आहेत. पण ती घटना घडली, तेव्हा त्या मुलाला पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी रूमवर गेलो आणि एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला आता सत्काराला बोलावू नका" असे लेशपालने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
अशा मुलांविषयी चीड होती व ती या घटनेतून बाहेर आली
लेशपाल हा आडेगाव माढा येथील रहिवासी आहे. मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मागील ४ वर्षांपासून तो पुण्यात आला आहे. स्पर्धा परिक्षा देण्यासाठी म्हणूनच तो पुण्यात आला. पर्वती पायथ्याला राहतो. अभ्यासिकेत बसण्यासाठी नवी पेठेत येतो. गावी शेती आहे. त्यादिवशी सदाशिवपेठेतून तो चालला होता. त्याच्यासमोरच मुलगी पळते आहे व तिच्यामागे कोयता घेऊन एक मुलगा धावतो आहे असा प्रसंग घडला. त्याने लगेचच पुढे धाव घेत त्या मुलाच्या हातातील कोयत्यासह त्याला धरले. त्यानंतर काही मुले धावत आली व त्यांनीही त्या मुलाला जेरबंद केले. दिल्लीत एका मुलीची हत्या होत असताना बघे काहीही न करता फक्त पहात बसल्याचे दृश्य बघितल्यापासून अशा मुलांविषयी चीड होती व ती या घटनेतून बाहेर आली असे लेशपालने सांगितले.