भोसरीत दिवसभर पावसाची रिपरिप, रस्त्यांवर गुडघाभर पाणी; जागोजागी गाड्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:27 PM2023-09-08T19:27:21+5:302023-09-08T19:30:02+5:30

अस्वच्छ पाणीच रस्त्यावर...

Day-long rain riprap in Bhosari, knee-deep water on roads; Trains stopped in places | भोसरीत दिवसभर पावसाची रिपरिप, रस्त्यांवर गुडघाभर पाणी; जागोजागी गाड्या बंद

भोसरीत दिवसभर पावसाची रिपरिप, रस्त्यांवर गुडघाभर पाणी; जागोजागी गाड्या बंद

googlenewsNext

भोसरी (पुणे) :भोसरीत शुक्रवारी जोरदार पाऊस बरसल्याने ओढे-नाले तसेच ड्रेनेज लाइन ओसंडून वाहत होत्या. पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने वाहनांना गुडघ्याएवढ्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून आले.

भोसरी, शांतीनगर, बालाजीनगर भागात जोरदार सरी बरसल्या. चऱ्होली, वडमुखवाडी, डुडूळगाव भागातही पावसाची संततधार सुरु होती. डुडूळगाव भागात दोन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना गुरुवारी रात्री घडल्या. बालाजीनगर, शांतीनगर, सावित्रीबाई फुले शाळेसमोरील रस्त्यांच्या दुतर्फा पाणी साचले होते. आपटे कॉलनी लगतच्या सखल भागात पाणी साचलेले पहायला मिळाले.

जागोजागी गाड्या बंद

भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृह, चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत जात असताना गाडीत पाणी शिरून गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

संथ वाहतूक

संततधार पावसामुळे नागेश्वर नगर, तुपे वस्ती, स्पाईन रस्ता येथे वाहतूक संथ गतीने होत होती. त्यामुळे चाकरमानी, विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. बस वाहतूक अतिशय संथ गतीने आणि बऱ्याच गाड्या उशिराने सुटत असल्याने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यास उशीर होत होता.

अस्वच्छ पाणीच रस्त्यावर

ड्रेनेजमधील अस्वच्छ पाणीच रस्त्यावरील वाहत्या पाण्यात मिसळत असल्याचे चित्र दिसून आले. बीआरटी टर्मिनल, फुगे प्राईम, भोसरी गावठाण, धावडे वस्ती, पीएमपीएल डेपो या ठिकाणी पावसाळी गटारे ड्रेनेज लाइनला जोडण्यात आली आहेत. मात्र, त्याची क्षमता मर्यादित असल्याने शुक्रवारी सकाळी झालेल्या पावसाने ड्रेनेज लाइनमधील अस्वच्छ पाणीच उलटे रस्त्यावर यायला लागले. परिणामी, पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावरून वाहायला लागल्याने बऱ्याच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Web Title: Day-long rain riprap in Bhosari, knee-deep water on roads; Trains stopped in places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.