वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने हे प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्नही झाला होता. परंतू, अखेर हे प्रकरण बाहेर आले आणि आता भोर-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.
कैलास उर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर याने नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला होता. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. समाजमाध्यमांवर माहिती प्रसारित होऊ लागल्याने ३६ तासांनंतर स्वत: पोलिसांचे काही चालले नाही, अखेर पत्रकार परिषदेत गोळीबाराचा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले होते.
यानंतर आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना पोलिसांनी केली अटक करण्यात आली. न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणपत जगताप, बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब मांडेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ आहे. यामुळे हे प्रकरण दाबण्यास सुरुवात झाली होती.
पार्टी लावण्यावरून वादाचा संशय
अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रुईकरांची पार्टी होती. मात्र, त्याचवेळी संशयित आरोपी यांनीही त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला. त्यातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र पोलिसांनी कोणीही तक्रार द्यायला आले नाही म्हणून काहीही केले नाही. परंतु, ज्यावेळी आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर येऊ लागले, तेव्हा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘तिन्ही कलाकेंद्र चालकांचे जबाब नोंदवत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासले; पण त्यामध्ये असे काही आढळून आले नाही.’ आम्ही दुसऱ्यांदा सीसीटीव्ही चेक करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
दुसऱ्यांदा गोळीबार
चौफुला येथील अंबिका कला केंद्र हे नावाजलेले आहे. एकेकाळी बरखा, अप्सरा या नामवंत नृत्यांगनांचा कलाविष्कार राज्यात गाजला आहे. त्यांचे बंधू अशोक जाधव यांच्या मालकीचे हे कला केंद्र आहे. यापूर्वीही या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबारामुळे हे कला केंद्र चर्चेत आले आहे.