कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्त नोंदणी कार्यालया'कडे शासनाचे दुर्लक्षच...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:54 IST2021-11-18T15:48:05+5:302021-11-18T15:54:45+5:30
शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे...

कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्त नोंदणी कार्यालया'कडे शासनाचे दुर्लक्षच...!
धनकवडी:धनकवडीसह, दत्तनगरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सुविधांची वाणवा असून कधी सर्व्हर डाउनची डोकेदुखी तर कधी खंडित वीजपुरवठ्याचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दत्तनगरमधील सब रजिस्ट्रार रजेवर तर धनकवडीतील दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने मागील पंधरा दिवसा पासून ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २० दत्त नगर येथील सबरजिस्ट्रार गेल्या आठ दिवसांपासून रजेवर आहेत. तर हवेली नं ९ धनकवडी या कार्यालयाचे कामकाज नोंदणी झालेले दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने मागील पंधरा दिवसापासून ठप्प झाले आहे.
दक्षिण विभागातील या दोन्ही कार्यालयात एका दिवसात १०० ते १२० दस्त नोंदणी होत असतात. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून एका कार्यालयात दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने तर दुस ऱ्या कार्यालयात सबरजिस्ट्रार रजेवर असल्याने जवळपास ९०० ते १००० दस्त नोंदणी होऊ न शकल्याने शासनाचा लाखों रुपयांचा निधी अडकला आहे.
या दोन्ही कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच दक्षिण उपनगरांमधील भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकर वाडी, कात्रज, दत्तनगर, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, नर्हे, कोळेवाडी, भारती विद्यापीठ, धनक वडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, चव्हाण नगर, पद्मावती भागातील नागरिक व वकील दस्तनोंदणीसाठी येतात. सहायक निबंधक रजिस्ट्रार रजेवर असल्याने दस्तनोंदणीचे काम गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच नागरिकांना देखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या असल्याने नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र उपनगरांमधील विविध उप निबंधक कार्यालयात दिसून येत आहे.