सायबर फसवणुकीतील 141 तक्रारदारांना दिलासा ; पाेलिसांनी केली रक्कम परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:47 IST2020-04-19T19:45:16+5:302020-04-19T19:47:12+5:30
लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमला बळी पडलेल्या नागरिकांना पाेलिसांनी दिलासा दिला आहे. फसवणुकीची रक्कम परत करण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीतील 141 तक्रारदारांना दिलासा ; पाेलिसांनी केली रक्कम परत
पुणे : मोबाईलवर आलेल्या एसएमएसद्वारे लाखो रुपये अकाऊंटला जमा होणार या आशेवर बसलेल्या ग्राहकाला गंडवण्याचे काम हॅकर्सकडून सुरूच आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकांना याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. ओटीपी शेअर करणे, बनावट लिंकला फॉलो करून बँक डिटेल्स देणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे फसवणूक झालेल्या 141 तक्रारदारांना सायबर विभागाकडून दिलासा मिळाला आहे. या तक्रारदारांना 57.77 लाख रुपये (फसवणूक झालेली रक्कम) परत करण्यात आले आहे.
नागरिकांना सातत्याने सायबर फसवणुकीबाबत माहिती दिली जात असल्याने सायबर गुन्ह्यात फरक पडल्याचे दिसून आले आहे. विशेषतः लॉकडाऊन सुरू झाल्यापासून यात मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे. याबाबत अधिक माहिती देताना आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, सध्या ज्या तक्रारदारांना फसवणूकीची रक्कम परत देण्यात आली आहे. त्यात ऑनलाइन खरेदी विक्री करताना झालेली फसवणूक, एखाद्या मॅट्रिमोनिअल साईट वरून घालण्यात आलेला गंडा, तसेच ओटीपी शेयर करून लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय क्रेडिट, डेबिट कार्ड धारक व्यक्तींच्या तक्रारीचा समावेश आहे. अशा 141 व्यक्तींना त्यांचे पैसे परत करण्यात आले आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारे आपली फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.आमिषाला बळी पडण्यात सुशिक्षित तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. लाख रुपयांच्या आमिषाला बळी पडून आपला अकाऊंट पासवर्ड तसेच ओटीपी ते शेयर करत असल्याने त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.
साधारण 1 ते 15 एप्रिल 2020 या काळात पुणे सायबर पोलीस विभागाकडे 700 पेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ती संख्या 744 इतकी होती. तर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दिवसाला 5 ते 10 तक्रारी येत आहेत.
सायबर फसवणुकीला बळी पडू नका याविषयी सतत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. व्हाट्स अप हॅकिंगचे प्रमाण आता कमी झाले आहे. सध्या इ कॉमर्स सुरू आहेत. यावर अनेकदा चुकीच्या लिंक वर क्लिक करून फसवणुकीला सामोरे जावे लागते. कुठलीही बँक ओटीपी मागत नाही. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. त्यानुसार अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
- संभाजी कदम (पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा)