खडक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:29 IST2017-11-07T18:22:31+5:302017-11-07T18:29:33+5:30
विविध पोलीस ठाण्यात दिवसा व रात्री घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

खडक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
पुणे : शहरातील विविध पोलीस ठाण्यात दिवसा व रात्री घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
इरफान उर्फ डंगाज खाजा शेख (वय २३, रा. राजीव गांधी कॉम्प्लेक्स, कासेवाडी भवानी पेठ) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शेख हा २००७ पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध खडक सह वानवडी, स्वारगेट, समर्थ पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, इतर चोरी आणि वाहन चोरी असे एकूण २९ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला २०११ मध्ये शहर व जिल्हयातून दोनदा तडीपार करण्यात आले होते. २०१४ मध्ये त्याने कोणतेही गुन्हेगारी कृत्य करू नये, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वागणुकीत काहीही फरक पडला नाही. त्याने या भागात दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशत आणि भीतीमुळे कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे त्याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शेख याला शहर व जिल्हा कार्यक्षेत्रामधून ७ नोव्हेंबर पासून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.
शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के व पोलीस उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, संजय गायकवाड व पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे, समीर सावंत यांनी कारवाई मध्ये भाग घेऊन प्रस्ताव केला.