प्रतिबंधित हुक्का प्लेवर्स विकणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:34+5:302021-02-05T05:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात प्रतिबंधीत असलेले हुक्का प्लेवर्स कायदेशीर असल्याचे भासवून त्याची सर्रासपणे विक्री करणाऱ्या शहरातील ...

प्रतिबंधित हुक्का प्लेवर्स विकणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात प्रतिबंधीत असलेले हुक्का प्लेवर्स कायदेशीर असल्याचे भासवून त्याची सर्रासपणे विक्री करणाऱ्या शहरातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील ८ हुक्का पार्लरवर प्रतिबंधीत हुक्का फ्लेवर्स व बेकायदेशीर तंबाखुजन्य पदार्थ, विदेशी सिगारेटची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचा तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर्स, वैधानिक इशारा नसलेले सिगारेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध दारु, गुटखा विक्री, जुगार खेळणे व अन्य अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील हुक्का पार्लरमध्ये हर्बल हुक्काच्या नावाखाली प्रतिबंधीत हुक्का प्लेवर्सची विक्री केली जात असल्याची खबर पोलिस आयुक्त गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर व विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी विविध पोलिस ठाण्यातील नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी यांच्या पथकाने कोरेगाव पार्क, स्वारगेट, चतुःशृंगी, लष्कर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई केली.
स्मोक्स चॉकलेट, कलंदर, लिटील गोवा, लष्कर परिसरात शिशा डेन, दिश्मा एंटरप्रायझेस, लाल देऊळ सोसायटी, सॅलिसबरी पार्कमधील इसेन्शीअल स्मोक स्टोअर, औंधच्या परिहार चौकातील स्मोकर वर्ल्ड शॉप या दुकानांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. संबंधीत ठिकाणी अफजल, रॉयल ब्रॅंड, अलफकीर, अल्लाऊद्दीन, महाराज, अलमलिका, अलअहयान, ऍपलपफ, मिस्टर हुक्का, हर्बल सोएक्स, हर्बल मोल्यासोएस अशा वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का प्लेवर्स, त्यासोबत लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले
--