Real Hero! आई अन् पत्नीचे दागिने गहाण ठेवून ७ दिवसांत उभं केलं कोविड हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 20:10 IST2021-05-04T19:51:57+5:302021-05-04T20:10:08+5:30
पुण्यातील धानोरी भागात ऑक्सिजनसह ५३ बेडचे कोविड हॉस्पिटल....

Real Hero! आई अन् पत्नीचे दागिने गहाण ठेवून ७ दिवसांत उभं केलं कोविड हॉस्पिटल
येरवडा: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. पुण्यातदेखील कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. रुग्णांची होणारी फरपट, त्यांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी व रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी आईचे व पत्नीचे दागिने गहाण ठेवून धानोरी येथे ऑक्सिजन बेडची सुविधा असणारे एकूण ५३ बेडचे छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल नुकतेच सुरू केले.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसांत जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या विधायक कामासाठी जवळचे मित्र विकास साठे, शांताराम खलसे, श्रीराम पाटील, दशरथ माटवणकर, अर्चना प्रधान यांनी मदतीचा हात पुढे केला. तर प्रसंगी उमेश चव्हाण यांनी स्वतःचे घरातील पत्नी आणि आईचे पस्तीस तोळे दागिने गहान ठेवून तीस लाखांची जुळवाजुळव केली.
चव्हाण म्हणाले, एकीकडे बेड नाहीत, औषध नाही अशा परिस्थितीत लोक आजाराला घाबरण्यापेक्षा उपचार मिळत नाहीत, यामुळे घाबरून जात आहेत. यामध्ये तरुण रुग्णांच्या मृत्यूनंतर सगळीकडे भीतीची मोठी लाट पसरली आहे. अनेक प्रयत्न करूनही बेड उपलब्ध होतच नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतःच कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचे ठरविले. या कोविड हॉस्पिटलमध्ये ३३ ऑक्सिजन बेड व २० जनरल बेडची सुविधा उपलब्ध आहे.