Coronavirus Pune Updates: पुण्यात रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदी; पालिका आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 12:27 AM2021-03-28T00:27:32+5:302021-03-28T00:27:49+5:30

हॉटेल, सिनेमागृहे, बार-रेस्टॉरंट आदी सार्वजनिक ठिकाणे आठ वाजता होणार बंद 

Coronavirus Pune Updates: Curfew in Pune between 8 pm and 7 am; Orders of Municipal Commissioner | Coronavirus Pune Updates: पुण्यात रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदी; पालिका आयुक्तांचे आदेश

Coronavirus Pune Updates: पुण्यात रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदी; पालिका आयुक्तांचे आदेश

Next

पुणे : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासोबतच पालिका हद्दीतील सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट, सिनेमागृहे, नाट्यगृह, प्रेक्षागृह सुद्धा रात्री आठ वाजता बंद करावी लागणार आहेत. सेवा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणांवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. या आदेशामधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. 
राज्य शासनापाठोपाठ महापालिकेने काढलेले आदेश २७ मार्च (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या आदेशाची रविवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार, सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा संमेलने यांस संपूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. भूमी पूजन, उदघाटन समारंभ व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे.  नाट्यगृह / प्रेक्षागृह या ठिकाणी देखील अशा प्रकारचे कार्यक्रम घेता येणार नाहीत.  दुकानामध्ये एकावेळेस ५ पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देणार नाहीत.

सर्व खाजगी कार्यालये (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयांबाबत कार्यालय प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येणार असले तरी कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे.  कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वेळेचे नियोजन आणि सुरक्षा साधने याचे नियोजन करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असलेल्या नागरिकांना / कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. 

शासकीय कार्यालातील गर्दी टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांना (निर्वासित सदस्य, पदाधिकारी वगळून) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग अथवा  कार्यालय प्रमुख यांच्याकडून प्रवेश पत्र दिले जाणार आहे.

सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणची जागेची उपलब्धता पाहून सुरक्षित अंतर पाळण्याच्या अनुषंगाने किती नागरिकांना प्रवेश देता येईल याची निश्चिती व्यवस्थापन / ट्रस्ट यांना करावी लागणार आहे. शक्यतो ऑनलाईन पासची व्यवस्था करण्यात यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

* सार्वजिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.
* लग्न समारंभ कार्यत्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
* अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रमाळा जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थिती असावी.
* पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने सकाळी ७ ते सकाळी १० या वेळेतच सुरु राहतील.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.  गृह विलगिकरणाबाबतची सर्व माहिती नागरीकांनी सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तसेच वैद्यकीय उपचारांबाबत माहिती देणे आवश्यक आहे. पॉझिटिव्ह झाल्यापासून १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पाळला जातो आहे की नाही याची खबरदारी घ्यायची आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

Web Title: Coronavirus Pune Updates: Curfew in Pune between 8 pm and 7 am; Orders of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.