CoronaVirus News: The capacity of tests is high, but the quantity is still low. Raman Gangakhedkar | CoronaVirus News : चाचण्यांची क्षमता खूप, प्रमाण मात्र अद्याप कमीच- डॉ. रमण गंगाखेडकर

CoronaVirus News : चाचण्यांची क्षमता खूप, प्रमाण मात्र अद्याप कमीच- डॉ. रमण गंगाखेडकर

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात जास्तीत जास्त चाचण्या व्हायलाच हव्यात, यात दुमत नाही. अजूनही चाचण्या करण्याची आपली खूप क्षमता आहे. पण पहिल्या दिवसापासून आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केलेला नाही. सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. लक्षणे असलेल्या व संपर्कातील व्यक्तींनी पुढे यावे. न घाबरता चाचणी करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. गंगाखेडकर म्हणाले, बाहेर फिरणे, अनेक लोकांच्या संपर्कात येणे हे संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आहे. हे प्रमाण किती आहे, कुणी सांगु शकत नाही. आता पुण्यात लॉकडाऊन लावले, याचा विचार आडाख्यांमध्ये केला जात नाही. ही गंभीर आरोग्य समस्या बनल्याने १० लाख किंवा ५० लाख लोकांना लागण झाली काय, याने फरक पडणार नाही. अशा परिस्थतीत आपल्याला किती संसर्ग होऊ शकतो, याचा विचार करून त्यावर नियंत्रण आणणे जरुरीचे आहे.
दहा दिवसांनी चाचणी
न करणे योग्यच
सध्याची रुग्णसंख्या पाहता आपल्याकडे खाटांची संख्या पुरेशी आहे. पण खाटा कमी पडतील, अशी वेळ येऊ शकते. आपण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवत आहोत. घरी सोडण्याचे धोरणही बदलत आहोत. दहा दिवसांनी चाचणी न करता रुग्णांना घरी सोडले जात आहे. या रुग्णांची चाचणी केली तर ‘आरटी पीसीआर’मध्ये रुग्णाच्या शरीरात विषाणू असल्याचे दिसते. ते जिवंत आहेत की नाही, हे कळत नाही. सर्वसाधारणपणे लक्षणे सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी शरीरातील विषाणू मृत झालेला असतो. पण चाचणीमध्ये त्याचे अस्तित्व दिसते. त्यामुळे ससंंर्ग होण्याचा धोका नाही.
हर्ड इम्युनिटीची वाट पाहायला नको
सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी किमान ६० लोकसंख्येला संसर्ग व्हावा लागेल. तेवढ्या लोकसंख्येमध्ये मृतांचा आकडा खूप मोठा असेल. हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीचा विचार करणेही चुकीचे ठरेल. संसर्ग होऊ नये, म्हणूनच दक्षता घ्यायला हवी.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मर्यादा
सुरूवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने बाधित व्यक्तीचे संपर्क शोधणे शक्य होत होते. रुग्णसंख्या वाढत असताना हे शोधणे कठीण असते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे धोरण आपण बदललेले नाही. ते करणे आजही अपेक्षित आहे. समजा पाच हजार लोकांना लागण झाली असेल तर घरी पाठवायला तेवढे मनुष्यबळही हवे. यासाठी समाजाने, सामाजिक संस्थांनी पुढे यावे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: The capacity of tests is high, but the quantity is still low. Raman Gangakhedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.