- राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल, तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्याकडे सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत दिला.
देशात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?लॉकडाऊनमध्ये लोकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. आपल्याकडची पहिली लाट अजूनही ओसरलेली नाही. ती ओसरत नाही, तोवर दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. दुसरी लाट दिसत नसली, तरी वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली, तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखू शकू. जगभरातील लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?जगात यापूर्वी कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारतात आठ लशी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लशींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने लसीची परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक असली तरी चालेल, असे म्हटले होते. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाइक प्रोटीनचा वापर केल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.लसीचा एक डोस घेतल्यानंतर हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला, ते पाहावे लागेल, तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली, तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?सप्टेंबरमधील सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली, तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली, असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे. आता हे प्रमाण किती असेल, हे सांगता येणार नाही, पण लसीकरण जून-जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत २५ कोटींचा आकडा काही प्रमाणात वाढलेला असेल.
जोखीम घ्यायला हवीमानवी चाचण्यांदरम्यान देण्यात आलेल्या लसींचा दुष्परिणाम जास्त असता, तर तो पहिल्या दोन महिन्यांमध्ये दिसला असता. त्यामुळे याचा फार मोठा दुष्परिणाम होईल, अशी भीती मनात ठेऊ नये. काही दुष्परिणाम लसीकरणानंतर दीड वर्षांनंतरही दिसू शकतात, पण याकडे आपण फायद्याच्या दृष्टीने पाहायला हवे. कारण ९५ टक्के लोकांमध्ये आता दुष्परिणाम दिसलेले नाहीत, त्यामुळे थोडी जोखीम उचलायला हरकत नाही.
गर्दी वाढूनही रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याने हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे का, याविषयी बोलताना ते म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते, तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही, इथपर्यंत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय. काही देशांतील परिस्थितीकडे पाहून असे वक्तव्य काहींनी केले असेल. त्याच्याशी आपली तुलना करणे योग्य नाही. आपल्याकडे अजून पहिली लाटच संपलेली नाही. अशा परिस्थितीत लस न देणे, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.