CoronaVirus :कमी प्रतीचे सॅनिटायझर आणि मास्क विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई ;पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:04 IST2020-03-13T13:57:58+5:302020-03-13T14:04:06+5:30
लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

CoronaVirus :कमी प्रतीचे सॅनिटायझर आणि मास्क विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई ;पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा दणका
पुणे :लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात अशाच पद्धतीने चढ्या दराने मास्क विकणाऱ्या आणि कमी प्रतीचे सॅनिटायझर विकणाऱ्या चार मेडिकल विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चीनमधून संपूर्ण जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूची लागण भारतातही झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा पुण्यात रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन, महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार नागरिक सॅनिटायझर आणि मास्क वापरत आहेत. मात्र त्यातही काही मेडिकल विक्रेते संधीचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करत आहेत. शिवाय अचानक मोठ्या संख्येने मागणी होत असल्याने कमी प्रतीचे सॅनिटायझर विकले जात आहे. यासंबंधी एफडीएने आता थेट तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील कोथरूड भागातील दोन आणि म्हाळुंगे व गोखले नगर भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे चार मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काही मेडिकल जवळपास दुप्पट दराने एन -९५ मास्क विकत होते. यापुढे जर असा कोणताही प्रकार आढळला तर ०२०/२४४७०२७६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएचे सहआयुक्त एस बी पाटील यांनी केले. शिवाय तक्रारदार fdadrugpune@gmail.com वरही संपर्क करू शकतात.