CoronaVirus: Ashadhi Paiwari Palkhi will be held by Corona; Final decision to be made after14th April vrd | CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय

CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय

- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी।। या उक्तीप्रमाणे दरवर्षी प्रत्येक वारकरी माऊली आणि तुकोबांच्या पायीवारी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. मात्र चालू वर्षी देशावर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "लॉकडाऊन" प्रक्रिया अवलंबविण्यात आली असून, राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे. रविवारी (दि.४) कोरोनासंदर्भात उपाययोजनांबद्दल अधिक माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, यापुढे कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक, विविध धर्मांचे सोहळे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. तसेच पंढरपूर येथील चैत्र वारी रद्द करण्यात आली असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळा रद्द झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी (पोर्टल) प्रसिद्ध केले. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये पालखी सोहळ्याबाबत उलट - सुलट चर्चांना उधाण आले आहे. 

या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गजन्य रोग प्रादुर्भावामुळे आषाढी पायीवारी सोहळा होणार किंवा नाही? याबाबत नक्कीच संदिग्धता आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी संस्थान कमिटी, फडकरी, मालक तसेच संबंधित अन्य घटकांची होणारी महत्त्वपूर्ण बैठक यावर्षी कोरोना व 'लॉकडाऊन'मुळे अद्याप झाली नाही. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. 

१४ एप्रिलला 'लॉकडाऊन' संपल्यानंतर आषाढी पायीवारी सोहळ्यासंदर्भात राज्यशासन, सोहळा मालक, फडकरी, दिंडी चालक - मालक, शितोळे सरकार आदींशी ज्ञानेश्वर महाराज संस्थांन कमिटीचे सर्व ट्रस्टी संपर्क साधून चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या आदेशानंतर वारी संदर्भातचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: Ashadhi Paiwari Palkhi will be held by Corona; Final decision to be made after14th April vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.