स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक ; जनजागृतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:42 PM2020-05-10T18:42:34+5:302020-05-10T18:45:08+5:30

स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते काेराेनाच्या संकटाच्या काळात घराबाहेर पडून गरजूंना मदत करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आता काेराेना संशयितेच्या नजरेने पाहिले जात आहे.

corona warriors get insulting treatment from neighbours rsg | स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक ; जनजागृतीची गरज

स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक ; जनजागृतीची गरज

Next

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग कोणत्याही प्रकारे कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना केवळ व्यक्तीच्या शरीरावर परिणाम करत नसून, मानसिकताही बदलू पाहत आहे. कोरोनाशी दोन हात करू पाहणाऱ्या व्यक्तींकडे, स्वयंसेवकांकडे, सामाजिक कार्यकर्त्यांकडे आजूबाजूचे लोक संशयाने पाहत असून त्यांना पटकन स्वीकारायला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत शासनाने नाममात्र शुल्क आकारून स्वयंसेवकांना 'स्वविलगीकरणाची' सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. यासाठी पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे, पोलीस आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

महाराष्ट्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा उभारत आहे. यामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार अशा अनेक घटकांचा समावेश आहे. याचप्रमाणे, गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्था, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावत आहेत. मात्र, अशा व्यक्तींबाबत सोसायटीतील किंवा भवतलाच्या परिसरातील व्यक्ती, नातेवाईक संशयाच्या नजरेने पाहतात. त्यांच्यापासून संक्रमण होण्याची भीतीही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली जाते. प्रत्यक्ष बाहेर पडून काम करणारे स्वयंसेवक स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आहेत. तरीही समाजाकडून मिळणारी दुर्लक्षित, संशयास्पद वागणूक यामुळे धैर्य तुटत चालल्याची खंत स्वयंसेकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

समाजावर कोरोनासारखे भयंकर संकट डोकावत असताना सर्वांनी एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. प्रत्येक जण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मदत करू शकत नाही. मात्र, एकमेकांना पाठिंबा देऊन ही लढाई लढता येऊ शकते. सेवाभावी संस्था, स्वयंसेवक गरजूंना अन्नधान्य पुरवठा करणे, डॉक्टर, पोलीस यांच्या कामाचा ताण कमी करणे असे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची मानसिकता कधी बदलणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते घरातही स्वतःला क्वारंटाईन करून घेत आहेत, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरणे, इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळणे अशा उपाययोजनांचा अवलंब करत आहेत. अशा वेळी कौतुकाचे चार शब्द तर दूरच; मात्र समाजाकडून मिळणारी नकोशी वागणूक, हेटाळणी थांबावी, यासाठी जनजागृती केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


कोरोनाविरोधातील लढाईत सध्या मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता आहे. गरजूंना अन्नधान्य वाटप, पोलिसांना मदत, तपासणी कॅम्प अशा विविध स्तरांवर कामे सुरू आहेत. याकामी बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सोसायटीमधूनच वाईट वागणूक मिळत आहे. तुमच्यामुळे संसर्ग पसरेल, अशी टिपण्णी ऐकायला मिळते. फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व नियम आम्ही पाळत असल्याने आमच्याकडे गुन्हेगार म्हणून न पाहता समाजाने स्वीकारावे, एवढीच अपेक्षा आहे. 

- रघुनाथ येमुल, अध्यक्ष, दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

बाहेरचे काम आटोपून किंवा ड्युटी संपवून घरी गेल्यावर कोरोनाच्या काळात लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यामुळे बाहेर कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी शासनाने नाममात्र दरात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत.

- संदीप साताळे, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: corona warriors get insulting treatment from neighbours rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.