"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:15 PM2024-05-30T14:15:18+5:302024-05-30T14:16:05+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024: "Tsunami of India Aghadi in the country, Narendra Modi will be defeated in Varanasi" claims the Congress leader who is contesting elections against Modi. | "देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा

"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा

एक जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा वाराणसीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते अजय राय यांनी मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. यावेळी वाराणसीमध्ये इंडिया आघाडीने अजय राय यांच्यामागे आपली सर्व ताकद एकवटली आहे. त्यामुळे मोदींना या निवडणुकीत कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी केला आहे.

एका मुलाखतीमध्ये वाराणसीमधील निवडणुकीबाबत अजय राय म्हणाले की, निवडणुकीच्या स्थितीबाबत इतरांपेक्षा मी अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासोबत विरोधी पक्ष अधिकाधिक भक्कम होत चालला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने भाजपाल एक कठोर संदेश दिला आहे.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षाच्या कॅडर प्रणालीचा सन्मान केला जात असे. मात्र आता असं होत नाही, असे अजय राय म्हणाले. 

मागच्या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींकडून दारुण पराभव झालेल्या अजय राय यांनी आता लोक समजूतदार झाले असून, यावेळी नक्की बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. जनता भाजपाची आश्वासनं ऐकून थकली आहे. तसेच बदल घडवण्याची संधी शोधत आहे. मागच्या वेळी नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये एक रात्रही थांबले नव्हते. मात्र यावेळी ते १३ आणि २१ मे रोजी दोन रात्री येथे थांबले होते, असेही अजय राय यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची त्सुनामी सुरू असून, त्यात भाजपा कुठे जाईल ते कळणारही नाही. वाराणसीमध्ये विकास दिसत नाही आहे. सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. मोदी गंगामातेचे पुत्र बनून आले होते. मात्र अजूनही गंगा प्रदूषित होत आहे.  शहरातील नाल्यांचं पाणी गंगेत सोडलं जात आहे. काशीला प्रयोगशाळा बनवून ठेवलं आहे. रोज नवनव्या प्रयोगांमुळे लोक त्रस्त आहेत. तसेच यावेळी वाराणसीमध्ये गुजराती भगाओ अभियान सुरू आहे. तसेच आता जनता मोदींना निरोप देईल, असा दावा अजय राय यांनी केला.

पूर्वी भाजपामध्ये असलेले अजय राय हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २००९ मध्ये ते समाजवादी पक्षात गेले होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.  

Web Title: Lok Sabha Election 2024: "Tsunami of India Aghadi in the country, Narendra Modi will be defeated in Varanasi" claims the Congress leader who is contesting elections against Modi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.