चिंताजनक! पुणे जिल्ह्यात गुरुवारीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाच हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:27 IST2021-03-18T14:41:11+5:302021-03-18T15:27:15+5:30
पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच ५ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात गुरुवारीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाच हजारांवर
पुणे : पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच ५ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांनी प्रशासनासमोर आव्हान निर्माण केले आहे. याच दरम्यान पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी सरासरी दर हा २५ टक्क्यांच्या पुढे जाऊन पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत घालून दिलेल्या निर्बंधाचे कठोर पालन करत काळजी घेणे अनिवार्य झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण बुधवारी मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. ही दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ही संख्या ५ हजारांच्या जवळपास पोहोचली होती. यामध्ये पुणे शहरातली रुग्ण संख्या २५०० पेक्षा जास्त होती तर पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास १२०० नवे रुग्ण सापडले होते. यामुळे प्रशासन यंत्रणांचे धाबे दणाणले होते.
पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यंत्रणा सतर्क झाल्या असून कठोर पावले देखील उचलत आहे. मात्र कोरोनाचा धोका वाढत असताना देखील नागरिक सर्रास विनामास्क फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना बाबतचे नियमांचे उल्लंघन करत आहे.
मात्र गुरुवारी देखील पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ ही ५ हजारांच्यावर पोहचली आहे. या आकडेवारीमध्ये संध्याकाळपर्यंत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे पॅाझिटिव्हीटी रेट २५% पर्यंत पोहोचला आहे. कोरोना आढावा बैठकीत कडक निर्बंध लावल्यानंतर देखील कोरोना बाधितांची वाढ मोठ्या सुरुच असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.