Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 11:45 IST2021-01-02T11:44:50+5:302021-01-02T11:45:27+5:30
पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार

Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील 75 लोकांवर शनिवार (दि. 2) रोजी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भगवान पवार यांनी दिली.
याबाबत डाॅ.भगवान पवार यांनी सांगितले, जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 62 हज्र 979 ऐवढे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, 8 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.यात पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व वयोवृद्ध लोक आणि अन्य आजार असलेल्या लोकांना, तर तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये म्हणजे पुणे शहरातील 25 लोकांसाठी जिल्हा औंध रुग्णालय येथे, पुणे ग्रामीण भागातील 25 लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माण, मुळशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 25 लोकांसाठी जिजामाता आरोग्य केंद्र पिंपरी-चिंचवड येथे ही रंगीत तालीम करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी, ॲपवर माहिती भरणे आदी सर्व गोष्टीची रंगीत तालीम होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.