Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:12 IST2020-07-22T19:11:37+5:302020-07-22T19:12:48+5:30
पुण्यातील रुग्ण तिथे घेऊ शकणार उपचार

Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध
पुणे : कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्यावतीने आयसीयू आणि ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतेच पुणे छावणी परिषदेने पालिकेला कोरोनकरिता सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय उपलब्ध करून देण्यास संमती दिली आहे. त्यामुळे पालिकेला आणखी १०० बेड्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये २० व्हेंटिलेटर्स बेड आणि ८० ऑक्सिजन बेडचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी दिली.
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. विशेषतः ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स असलेल्या खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे विविध महाविद्यालये, शाळांमध्ये सेंटर्स सुरू केली जात आहेत. यासोबतच शहरातील विविध रुग्णालयांसोबत करार करून खाटा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांनी कॅन्टोन्मेंटचे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय पालिकेला कोरोनासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. कॅन्टोन्मेंट आणि पालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हे रुग्णालय कोरोना उपचारांसाठी पालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच करार केला जाणार असून पालिकेला एकूण १०० खाटा उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या हद्दीतील रुग्ण याठिकाणी उपचार घेऊ शकणार आहेत.
----------
सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या एकूण १०० खाटा उपलब्ध होणार असून यातील २० खाटा या व्हेंटिलेटर्सच्या असून ८० खाटा ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. यातील ४० खाटा प्रत्यक्ष ताब्यात आल्या आहेत. यामध्ये १० व्हेंटिलेटर्स आणि ३० ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे.
-----------
कोरोनामुळे पालिकेला खाटा कमी पडू लागल्या आहेत. कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय पालिकेला कोरोनासाठी देण्यासाठी प्रयत्न केले त्याला यश आले. याठिकाणी १०० खाटा उपलब्ध होणार असून रूग्णांची सोया होणार आहे.
- सुनील कांबळे, आमदार