Corona virus : पुणे महापालिकेचे काही नगरसेवक ठरवताहेत रेमडेसिविर कधी द्यायचं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 22:10 IST2021-04-28T21:58:38+5:302021-04-28T22:10:00+5:30
खासगी कोविड सेंटरला इशारा : नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Corona virus : पुणे महापालिकेचे काही नगरसेवक ठरवताहेत रेमडेसिविर कधी द्यायचं
पुणे : खासगी रुग्णालयांसोबत करार करून आपापल्या भागात कोविड केअर सेंटर उभारण्याची नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. आतापर्यंत अशा प्रकारची २६ रुग्णालये उभारण्यात आली आहेत. या कोविड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना ठेवता येत नाही. मात्र, काही नगरसेवक रुग्णाचा एचआरसीटी स्कोर १८ असतानाही रेमडेसिविर द्या अशी मागणी करत आहेत. त्यामुळे अधिकारी वैतागले
आहेत.
या कोविड सेंटरमध्ये साध्या खटांसह ऑक्सिजन, आयसीयू खाटांची परवानगी मिळावी यासाठी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत आहेत. शहरात ऑक्सिज पुरवठा कमी होत असल्याने हे अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या आयुक्त कार्यालयात फेऱ्या वाढल्या आहेत.
दरम्यान, या कोविड सेंटरवर पालिकेचे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिला आहे. शहरातील रुग्ण वाढल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने खासगी रुग्णालयांसोबत करार करून कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे शहरात ९ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये अशा प्रकारचे २६ कोविड सेंटर सुरू झाले आहेत. जागेवर पाहणी न करता अग्निशामक दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिली जात असल्याचे समोर आले आहे.
----
नियमाप्रमाणे खासगी कोविड सेंटर सुरू आहेत की नाही याची पाहणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार केले जातात. खाजगी कोविड सेंटर सुरू इच्छिणार्या संस्थानी पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सुविधा पुरविण्यासाठी पुढे यावे.
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
----