Corona virus : हाँगकाँगचे 'लॉकडाऊन' विना कोरोनावर नियंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 13:11 IST2020-04-03T12:55:11+5:302020-04-03T13:11:05+5:30
ठप्प न होता आवश्यक खबरदारी घेऊन दैनंदिन जनजीवन सुरळीत

Corona virus : हाँगकाँगचे 'लॉकडाऊन' विना कोरोनावर नियंत्रण!
अभय नरहर जोशी -
पुणे : चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश असलेल्या हाँगकाँग चीनचा प्रदेश असून आणि चीनच्या एवढ्या जवळ असूनही जगभर थैमान घालत असलेल्या 'कोविड १९' म्हणजेच कोरोना विषाणूच्या साथीची तुलनेने खूपच कमी झळ बसली आहे. या प्रदेशात २ एप्रिलअखेरपर्यंत ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून चार जणांचा या रोगाने बळी घेतला आहे. मूळचे मुंबईकर असलेले तेथील सिटी बँकेतील अधिकारी मंगेश रेळेकर यांच्याशी 'लोकमत'ने साधलेल्या संवादातून ही माहिती मिळाली.
ब्रिटिशांकडून १९९७ मध्ये चीनमध्ये विलीन झालेल्या मात्र अद्याप स्वायत्त असलेल्या हाँगकाँगवासियांचा चिनी सत्ताधाऱ्यांशी तीव्र संघर्ष सुरू होता. मात्र हे आंदोलन नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ दरम्यान थंड होत नाही तोच जानेवारीपासून कोरोनाच्या साथीविषयीच्या बातम्या चीनमधून येऊ लागल्या. तरीही येथील जनजीवन सुरळीत सुरू होते. या वर्षीच्या १५ मार्चपर्यंत हाँगकाँगमध्ये २०० च्या आसपास कोरोनाबाधित होते, अशी माहिती देऊन रेळेकर यांनी सांगितले, की आता ही संख्या ८०० च्या दरम्यान जरी गेली असली तरी या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण येथे खूप कमी आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
असे असले तरी ७५ लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेले हाँगकाँग लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेले नाही. येथील शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम अशी सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज ऑनलाईन सुरू आहे. मात्र, येथील रेस्टॉरंट सुरू आहेत. मात्र, चारपेक्षा जास्त जणांना तेथे अजिबात एकत्र येता येत नाही. दोन टेबलमधील अंतरही एक मीटरवर ठेवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक केले आहेत व ते येथील नागरिकांकडून कसोशीने पाळले जात आहेत. येथील मॉल सुरू आहेत. ट्रेन, बस ही सार्वजनिक वाहतूकही अव्याहत सुरू आहे. सर्व नागरिक मास्क वापरून योग्य अंतर राखत दैनंदिन व्यवहार करत आहेत. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे पाळली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी हँड सॅनेटायझर ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे सिंगापूरप्रमाणे भारतीय लक्षणीय संख्येने नसले तरी महाराष्ट्र मंडळ आहे. भारतीय उपाहारगृहांतून भारतीय अन्न मिळू शकते, अशी माहितीही रेळेकर यांनी दिली.
----------
कोरोनाची अनावश्यक भीती न बाळगता किंवा काळजी करत न बसता हाँगकाँगवासीय आवश्यक ती काळजी घेत आहेत. मात्र, दैनंदिन व्यवहार त्यांनी ठप्प होऊ दिले नाहीत. कोरोनाचा उद्रेक झालेल्या चीनचाच एक प्रदेश असूनही त्यांनी कमालीच्या सकारात्मकतेने ते या संकटाचा सामना करत आहेत. भारतीयांना हाँगकाँगवासीयांचा हा आदर्श जरूर घेण्याजोगा आहे.
- मंगेश रेळेकर, हाँगकाँगवासीय बँक अधिकारी