Corona virus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 13:04 IST2020-07-25T13:01:45+5:302020-07-25T13:04:03+5:30
पालिकेच्या मदतीसाठी अधिकारी देण्याची केली होती मागणी

Corona virus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती
पुणे : शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, आरोग्य विषयक उपाययोजनांबाबत पालिकेला अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता भासते आहे. त्यातच आरोग्य प्रमुख आजारी पडल्याने आरोग्य विभागाचे काम मंदावले आहे. त्यामुळे, पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्याची पालिकेत बदली केली आहे.
शहरातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४४ हजारांच्या पुढे गेली असून ऍक्टिव्ह रुग्ण १७ हजारांच्या घरात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सलग चार महिन्यांपासून सलग काम करीत आहेत. पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आजरी पडले असून १० दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील काम संथ गतीने सुरू आहे. पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे वैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्याची पालिकेत नियुक्ती केली आहे.
डॉ. नितीन बिलोलीकर असे त्यांचे नाव आहे. बिलोलीकर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. डॉ. बिलोलीकर यापूर्वी विविध पदांवर काम केलेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागात सह संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांना कोरोना संबंधीत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून त्यांची पालिकेला मदत होणार आहे. तसेच त्यांचे वेतन राज्य शासनाकडून दिले जाणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
------
कोरोनाच्या काळात पालिकेच्या मदतीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. सध्या तब्येतीच्या कारणामुळे आरोग्य प्रमुखही रजेवर आहेत. कामाची गैरसोय टाळण्याकरिता तसेच मदतीकरिता पालिकेला जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाचे अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांना पाठविण्यात आले आहे. त्यांची निश्चितच मदत होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका